ब्रेकिंग: जामखेड गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी ‘चिंग्या मोरे’ जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची खर्डा शिवारात मोठी कारवाई
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड शहरातील न्यू कावेरी हॉटेलवर गोळीबार (Jamkhed firing case) करून दहशत माजवणारा आणि गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला मुख्य आरोपी अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे (Akshay Chingya More) या कुख्यात गुन्हेगाराला जेरबंद करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि जामखेड (Jamkhed) व खर्डा पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने ही मोठी कारवाई केली. खर्डा (Kharda) परिसरात ही कारवाई करण्यात आली.

जामखेड-बीड रोडवरील न्यू कावेरी हॉटेलवर १८ डिसेंबर २०२५ रोजी मोठा राडा झाला होता. फिर्यादी रोहित अनिल पवार आणि त्यांच्या साथीदारांवर आरोपींनी जीवघेणा हल्ला केला होता. यावेळी कुख्यात गुन्हेगार अक्षय उर्फ चिंग्या मोरे याने त्याच्या इतर साथीदारांसह बेकायदेशीर जमाव जमवून पिस्टलने गोळीबार केला, ज्यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाला होता. याशिवाय हॉटेलमधील सामानाची आणि गाडीची सत्तूर व लाकडी दांड्याने तोडफोड करून मोठे नुकसान केले होते. याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) आणि आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा घडल्यापासून मुख्य आरोपी अक्षय उर्फ चिंग्या मोरे फरार होता. तो खर्डा परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे यांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने खर्डा गावच्या शिवारात तांत्रिक कौशल्याचा वापर करत सापळा रचला आणि आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. चिंग्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे.
अक्षय उर्फ चिंग्याचा गुन्हेगारी रेकॉर्ड
अटकेत असलेला अक्षय उर्फ चिंग्या मोरे (वय २४, रा. पाटोदा गरड, ता. जामखेड) हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर जामखेड पोलीस स्टेशनमध्ये २०१८ पासून आतापर्यंत तब्बल १० गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये:
- कलम ३०२ (हत्या): १ गुन्हा
- कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न): ४ गुन्हे
- आर्म ॲक्ट: ४ गुन्हे
- इतर: दंगल, खंडणी आणि मारहाणीचे गुन्हे
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा आणि जामखेड पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या पथकात स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि हरिश भोये, पोउपनि महादेव गुट्टे, समीर अभंग, तसेच पोलीस अंमलदार सुरेश माळी, फुरकान शेख, हृदय घोडके, अतुल लोटे, विष्णू भागवत, गणेश लोंढे, शाम जाधव, रिचर्ड गायकवाड, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, योगेश कर्डिले, अमृत आढाव, प्रशांत राठोड, चालक अर्जुन बडे आणि भगवान धुळे यांचा समावेश होता.
तसेच जामखेड पोलीस स्टेशनचे पोउपनि किशोर गावडे, पुष्कर कडू, पोलीस अंमलदार प्रविण इंगळे, रविंद्र वाघ, देवीदास पळसे, कुलदीप घोळवे, दत्तात्रय बेल्हेकर, आकाश शेवाळे, प्रताप देवकाते आणि मनोज लातूरकर यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला.