निसर्गाचा ‘डबल अटॅक’! एका बाजूला सूर्य आग ओकतोय, तर दुसऱ्या बाजूला घोंघावतेय ‘गारपिटी’चं अस्मानी संकट, पुढील ४ दिवस धोक्याचे
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यात निसर्गाचा लहरीपणा आता शिगेला पोहोचला आहे. सध्या हवामानाचा विचित्र खेळ पाहायला मिळत असून, एकाच वेळी ‘उष्णतेची लाट’ आणि ‘अवकाळी पावसाचा इशारा’ देण्यात आला आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्याला वादळी पावसाचा मोठा तडाखा बसणार असून, काही भागात गारपीटीचा (Hailstorm) इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातही हलक्या पावसाची शक्यता आहे.

“महाराष्ट्रावर अस्मानी संकट घोंघावत असून संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारा पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार राज्यासाठी पुढील ४ दिवस धोक्याचे आहेत. अनेक भागांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे राज्यातील अनेक भागांत उन्हाळा रौद्र रूप धारण करताना दिसत आहे. कर्जत-जामखेड तालुक्यातही पुढील ४ दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी काढणीस आलेल्या पिकांची तातडीने काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.”
महाराष्ट्र हवामान अंदाज मार्च २०२६ : पावसाचा जोर वाढणार (शुक्रवार, १३ मार्च)
भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) च्या अंदाजानुसार, उद्या १३ रोजी विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस हजेरी लावेल. उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना हा पाऊस दिलासा देण्याऐवजी पिकांच्या नुकसानीची धास्ती वाढवणारा ठरणार आहे.

शनिवारी ‘या’ ११ जिल्ह्यांना धोका!
शनिवारी (१४ मार्च) पावसाचा जोर अधिक वाढणार असून, हवामान विभागाने खालील जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा इशारा दिला आहे:
- पश्चिम महाराष्ट्र: सातारा, सांगली, सोलापूर.
- मराठवाडा: बीड, धाराशिव.
- विदर्भ: भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ.
- तसेच अहिल्यानगर (नगर), पुणे, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यातही ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस कोसळण्याची दाट शक्यता आहे.
रविवारी आणि सोमवारी विदर्भ-मराठवाडा ‘हाय अलर्ट’वर!
रविवार (१५ मार्च): नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि नांदेडमध्ये हलका पाऊस अपेक्षित आहे. मात्र, कोल्हापूर, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव आणि संपूर्ण विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा ‘तांडव’ पाहायला मिळू शकतो.

सोमवार (१६ मार्च): विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा जोर कायम राहील, तर मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरी सुरूच राहतील.
राज्यातील या भागांना उष्णतेच्या लाटेचा इशारा
मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यासाठी उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून काही भागांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच अनेक भागांत तापमानाने चाळीशी गाठली आहे. विदर्भातील अकोला येथे बुधवारी राज्यातील सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.