Maharashtra kesari 2026 Winner : हर्षवर्धन सदगीरचा ऐतिहासिक पराक्रम! ‘बाहुबली’ महेंद्र गायकवाडला आस्मान दाखवत बनला डबल ‘महाराष्ट्र केसरी’
वाघोली पुणे : महाराष्ट्राची आण बाण आणि शान म्हणून ओळख असलेली महाराष्ट्र केसरी स्पर्धा वाघोलीत पार पडली. (Maharashtra Kesari 2026) अंतिम लढतीत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर (Harshvardhan Sadgir) याने सोलापूरच्या ‘बाहुबली’ पैलवान महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) याचा ४-३ अशा गुणफरकाने पराभव केला.या विजयासह (Winner) हर्षवर्धन सदगीरने दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची (double ‘Maharashtra Kesari) चांदीची गदा उंचावून इतिहास रचला आहे. असा पराक्रम करणारा तो सातवा मल्ल ठरला आहे.

अंतिम लढतीचे वैशिष्ट्य म्हणजे हर्षवर्धन आणि महेंद्र हे दोन्ही मल्ल अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या तालमीत तयार झालेले आहेत. एकाच आखाड्यात सराव करणाऱ्या या दोन वाघांमध्ये सुरुवातीपासूनच चुरस पाहायला मिळाली. पहिल्या फेरीत महेंद्र गायकवाडने १-० अशी आघाडी घेतली होती, मात्र दुसऱ्या फेरीत हर्षवर्धनने आपल्या अनुभवाच्या जोरावर जबरदस्त कमबॅक केले आणि ४-३ च्या फरकाने विजय खेचून आणला.

विजेत्या हर्षवर्धन सदगीरला मानाची चांदीची गदा, रोख पुरस्कार आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे आणि मंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. यावेळी कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी आणि हजारो कुस्तीप्रेमी उपस्थित होते.

हर्षवर्धन सदगीरने यापूर्वी २०२० मध्ये महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला होता. सहा वर्षांनंतर पुन्हा एकदा गदा मिळवून त्याने आपल्या नावाचा डंका संपूर्ण महाराष्ट्रात वाजवला आहे. हर्षवर्धन दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी गदा जिंकणारा एकूण सातवा कुस्तीपटू ठरला. तर महेंद्र गायकवाड याचं यंदाही महाराष्ट्र केसरी होण्याचं स्वप्न भंग झालं.
या विजयानंतर चांदीची गदा देऊन सन्मानित करण्यात आलं. तसेच हर्षवर्धनला 5 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच हर्षवर्धनाला फॉच्युनर गाडी देऊन सन्मानित केलं गेलं. तर उपविजेत्या महेंद्र गायकवाड याचा 4 लाख रुपयांचा धनादेश आणि स्कॉर्पियो गाडी देण्यात आली.
तसेच माती आणि गादी विभागातील विविध वयोगटातील सूवर्णपदक विजेत्या कुस्तीपटूंना एकूण 18 बुलेट देण्यात आल्या. तसेच रौप्यपदक विजेत्या कुस्तीपटूंना स्पेलंडर बाईक देण्यात आली.