ब्रेकिंग न्यूज: राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांच्या संख्येत वाढ, राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राजकीय पक्षांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रमुख प्रचारकांच्या (Star Campaigner) संख्येची मर्यादा २० वरून ४० पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आगामी नगरपरिषद, नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांना अधिक व्यापक प्रचार मोहीम राबविण्याची संधी मिळणार आहे.

१४ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी “प्रमुख प्रचारकांची मर्यादा वाढवावी” अशी मागणी केली होती. त्यानुसार आयोगाने ही मागणी विचारात घेत निर्णय घेतला आहे.
‘महाराष्ट्र राज्य राजकीय पक्ष नोंदणी, विनियमन आणि निवडणूक चिन्ह (आरक्षण व वाटप) आदेश, २०२५’ या आदेशातील परिच्छेद २६ मध्ये प्रमुख प्रचारकांविषयीच्या तरतुदी नमूद आहेत. त्याच आधारे आणि पक्षांकडून आलेल्या मागण्यांचा अभ्यास करून आयोगाने ही मर्यादा वाढवली आहे.
आता राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रमुख प्रचारकांची यादी संबंधित जिल्हाधिकारी किंवा महानगरपालिका आयुक्तांकडे सादर करावी लागणार आहे.
राजकीय वर्तुळात या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून, यामुळे प्रमुख पक्षांना प्रचारात अधिक लवचिकता आणि संघटनात्मक ताकद दाखवण्याची संधी मिळेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
- 📌 मुख्य मुद्दे :
- प्रमुख प्रचारकांची मर्यादा २० वरून ४० पर्यंत वाढली
- १४ ऑक्टोबरच्या बैठकीत पक्षांकडून मागणी
- आयोगाने ‘२०२५ आदेश’ मधील तरतुदीनुसार निर्णय घेतला
- प्रमुख प्रचारकांची यादी जिल्हाधिकारी किंवा आयुक्तांकडे सादर करावी लागणार