Local Body Election 2025 : राज्य निवडणूक आयोगाची गुरूवारी बैठक, या तारखेला लागणार आचारसंहिता !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बार पुढच्या महिन्यात उडण्याची शक्यता आहे.१० नोव्हेंबरपूर्वी पहिला टप्प्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने गुरूवारी (ता. ३०) राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांची बैठक बोलावली आहे. निवडणूक तयारीचा आढावा घेऊन पुढील १० दिवसांत निवडणुकीचा पहिला टप्पा जाहीर केला जाईल, असे निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Local Body Election 2025, State Election Commission meeting on Thursday, code of conduct to be implemented on this date,

राज्यातील ३२ जिल्हा परिषदा, ३३१ पंचायत समित्या व २८९ नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. मतदार याद्या जाहीर होताच कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रमांची घोषणा होऊ शकते.पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती की नगरपालिका, नगरपरिषद निवडणूक कार्यक्रमांची घोषणा होते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.२९ महापालिकांच्या प्रभाग निहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम बाकी आहे.या निवडणूका नव्या वर्षांच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात होतील.

विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांसमवेत होणाऱ्या बैठकीत प्रत्येक जिल्ह्यातील उपलब्ध मनुष्यबळ व ईव्हीएम आणि मतदार याद्यांवरील हरकती व त्यावरील तोडगा, अशा प्रमुख बाबींचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात कोणकोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेता येईल हे निश्चित होणार आहे.

निवडणूका निश्चित वेळेतच होणार

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोग देशातील १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) करणार आहे. ही कार्यवाही ४ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. पण, त्यात महाराष्ट्र राज्याचा समावेश नसल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत होतील, असे देखील राज्य निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

जानेवारीत संपणार १४,२३४ ग्रामपंचायतींची मुदत

राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायत निवडणुकीचा मोठा टप्पा जानेवारी २०२६ मध्ये होईल. तत्पूर्वी, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका होणे अपेक्षित आहे.