स्मशानभूमीत घुमला भक्तीचा स्वर! खर्ड्यात ‘Art Of Living’ कडून स्वच्छता अभियान; अनोख्या सत्संगाची जामखेड तालुक्यात चर्चा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : मृत्यूनंतर जिथे जिवाला चिरशांती मिळायला हवी, त्याच ठिकाणी जर कचऱ्याचे साम्राज्य असेल तर? अशीच काहीशी अवस्था खर्डा येथील ईट रोड स्मशानभूमीची झाली होती. मात्र, केवळ चर्चा न करता खर्डा येथील ‘आर्ट ऑफ लिविंग’ परिवाराने प्रत्यक्ष कृतीचा आदर्श घालून दिला आहे. या परिवाराने विशेष स्वच्छता मोहिम राबवत स्मशानभूमीचा कायापालट केला असून, मोहिमेनंतर तिथेच रंगलेल्या ‘भजन सत्संगाची’ सध्या संपूर्ण जामखेड तालुक्यात चर्चा रंगली आहे.

kharda samashan bhumi swachhata abhiyan art of living satsang jamkhed

​जामखेड तालुक्यातील खर्डा शहराच्या पूर्व दिशेला असलेल्या ईट रोड स्मशानभूमीची गेल्या अनेक दिवसांपासून मोठी दुरवस्था झाली होती. या ठिकाणी प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, कुजलेली लाकडं, बांबूचे तुकडे, अनावश्यक झाडे-झुडपे, गवत आणि फेकून दिलेले जुनाट कपडे यांचा मोठा ढीग साचला होता. अस्वच्छतेमुळे या परिसरात जाणेही कठीण झाले होते. ही बाब लक्षात घेऊन ‘आर्ट ऑफ लिविंग’ परिवाराने स्मशानभूमी स्वच्छता अभियान हाती घेतले होते.

View this post on Instagram

​या स्वच्छता मोहिमेत केवळ आर्ट ऑफ लिविंगचे साधकच नव्हे, तर शहरातील विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी हातात झाडू आणि फावडे घेऊन अवघ्या काही तासांत संपूर्ण स्मशानभूमीचा परिसर चकाचक केला.

kharda samashan bhumi swachhata abhiyan art of living satsang jamkhed

​स्वच्छतेनंतर स्मशानभूमीत रंगला अनोखा सत्संग

​स्मशानभूमी पूर्णपणे स्वच्छ झाल्यानंतर सर्व साधक आणि ग्रामस्थांनी तिथेच एकत्र जमून आर्ट ऑफ लिविंगची भजने गायली. एरवी स्मशानभूमी म्हटलं की मनात येणारी भीती किंवा नैराश्य दूर सारून, तिथे भक्तीचा स्वर घुमल्याने एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले. स्वच्छतेचा संदेश आणि त्यानंतरचा हा आगळावेगळा सत्संग पाहून उपस्थित ग्रामस्थांनी या उपक्रमाचे मोठे कौतुक केले.

kharda samashan bhumi swachhata abhiyan art of living satsang jamkhed

या अभियानामध्ये आर्ट ऑफ लिविंगचे प्रशिक्षक संतोष थोरात, रवी कुलकर्णी, गणेश जोगदंड, महेश लोंढे, प्रकाश सोनटक्के, डॉ. अमोल वडे, गोकुळ गोलेकर, राजेंद्र चव्हाण, धनसिंग साळुंखे, संतोष साबळे, विशाल गोलेकर, जावेद सय्यद, विकास पवार, निलेश यादव, कल्याण सुरवसे, ज्ञानेश्वर इंगोले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (श.प. गट) तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, बाजार समितीचे संचालक वैजनाथ पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे उपस्थित होते. महिला साधकांमध्ये वैशाली थोरात, मनीषा कुलकर्णी, जया जोगदंड यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला.

📢 ताज्या बातम्या मिस करू नका!
👉 जामखेड टाइम्स Channel Follow करा