अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांनो सावधान, पुढील ४८ तास धोकादायक, हवामान विभागाकडून ऑरेंज व येलो अलर्ट जारी
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रासह (Maharashta) देशातील अनेक राज्यांच्या हवामानात (Weather) वेगाने बदल झाल्यामुळे अवकाळी पावसाचा (Avakali Paus) धुमाकूळ सुरू आहे.अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यासाठी धडकी भरवणारा अलर्ट (Rain Alert) जारी करण्यात आला आहे. पुढील ४८ तास जिल्ह्यासाठी अत्यंत धोकादायक आहेत. हवामान विभागाने उद्या व परवासाठी (३० व ३१ मार्च) ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह भीषण वादळ आणि गारपिटीची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस कर्जत-जामखेडसह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा धुडगूस पाहायला मिळू शकतो. त्याचबरोबर १ आणि २ एप्रिल रोजी सुध्दा जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आलाय, या काळात मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुटण्याचा अंदाज आहे. आगामी चार दिवस भीषण वादळी पावसाचे असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नजीकच्या पोलीस स्टेशन किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे टोल फ्री क्रमांक १०७७ तसेच ०२४१-२३२३८४४ अथवा २३५६९४० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे अवाहन उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.
भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात दि. ३० व ३१ मार्च, २०२६ या कालावधीत तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह वादळे, सोसाट्याचा वारा व गारपीटीची शक्यता व्यक्त केली असून जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तसेच दि. १ व २ एप्रिल २०२६ या कालावधीत वीजांच्या कडकडाटासह वादळे, मध्यम पाऊस व वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने ‘येलो अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे.
मेघगर्जना, वीजा चमकणे किंवा वादळी वारे असताना झाडाखाली उभे राहू नये; सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. वादळाच्या वेळी कोणतेही विद्युत उपकरण वापरू नये व विद्युतवाहक वस्तूंपासून दूर राहावे. मोकळे मैदान, टॉवर्स, विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मर, धातूचे कुंपण यांजवळ थांबू नये. जाहिरात फलक (होर्डिंग्ज) परिसरात थांबणे टाळावे. वीजा चमकत असताना उघड्यावर असल्यास गुडघ्यावर बसून शरीराचा जमिनीशी संपर्क कमी ठेवावा.
धरण, नदी किंवा कालव्यांच्या पाण्यात उतरू नये; धोकादायक ठिकाणी सेल्फी घेणे टाळावे.शेतकऱ्यांनी पाऊस व गारपीट लक्षात घेऊन शेतीमालाचे संरक्षण व साठवणूक करावी. बाजार समितीत आणलेला माल सुरक्षित ठेवण्याची खबरदारी घ्यावी.जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे. नागरिकांनी वादळी वारे, वीज, पाऊस व गारपीट यापासून स्वतःचे व जनावरांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.