कर्जत ब्रेकिंग: राशीन काॅपर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश, आंतरजिल्हा टोळी जेरबंद,३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, नगर एलसीबीची धडक कारवाई

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राशीन येथे आठ दिवसांपूर्वी झालेल्या काॅपर चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात एलसीबीला यश आले आहे. या प्रकरणाच्या तपासात एलसीबीने काॅपर वायर चोरी करणाऱ्या आंतर जिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीचे आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. एलसीबीने या टोळीकडून साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून पाच आरोपी फरार आहेत.

Karjat Breaking, Rashin Copper theft case exposed, inter-district gang arrested, valuables worth Rs 3 lakh seized, nagar LCB takes strong action, karjat jamkhed latest news today,

कर्जत तालुक्यातील राशिन येथील नागेश पांडुरंग पवार यांचे शिवम मशिनरी अँड स्टुल्स हे दुकान फोडून अज्ञात चोरट्याने  दुकानातील ६४ हजार रुपये किमतीची कॉपर वायर चोरुन नेण्याची घटना १५ सप्टेंबर रोजी घडली होती. घटनेबाबत कर्जत पोलीस स्टेशन गु.र.नं. 508/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331(4), 305(a) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास एलसीबीच्या विशेष पथकाकडे सोपवण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सलग आठ दिवस कसून तपास केल्यानंतर राशीन कॉपर वायर चोरी प्रकरणातील आरोपींनी वापरलेल्या चारचाकी गाडीचा छडा लागला. सदरची गाडी ही रेकॉर्डवरील आरोपी महादेव पवार रा. अकलुज, सोलापुर हा वापरत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एलसीबीने सदर आरोपीचा त्याच्या घरी शोध घेतला असता  1) महादेव रंगनाथ पवार वय 48 वर्ष रा 21 चारी माळीनगर अकलुज ता. माळशिरस जि. सोलापुर, 2) दादा लाला काळे वय 19 वर्ष रा. सवतगाव ता. माळशिरस जि. सोलापुर असे दोघे मिळुन आले.

दोघा आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता 3) रामा लंग्या काळे रा. तुळजापुर नाका जुना डेपो, पारधी पेढी ता. जि. धाराशीव (फरार) 4) महादेव बाबु काळे रा. तुळजापुर नाका जुना डेपो, पारधी पेढी ता. जि. धाराशीव (फरार), 5) दिलीप मोहन पवार रा. 21 चारी माळी नगर ता. माळशिरस जि. सोलापुर (फरार) 6) सुरेश नामु काळे रा. सवतगाव ता. माळशिरस जि. सोलापुर (फरार), 7) सुरेश नामदेव चव्हाण रा. सवतगाव, ता. माळशिरस जि. सोलापुर (फरार) यांच्यासह गुन्हा केल्याचे कबुली दिली आहे.

यावेळी ताब्यातील दोघ आरोपीकडून एलसीबीने 3,59,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या आरोपींनी अहिल्यानगर व सोलापुर जिल्ह्यात आठ गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आरोपी महादेव रंगनाथ पवार हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याच्याविरुध्द सोलापुर, धाराशिव, सातारा, रायगड व पुणे जिल्ह्यामध्ये दरोड, घरफोडी व चोरीचे एकुण 13 गुन्हे दाखल आहेत.

ताब्यातील दोघा आरोपींना कर्जत पोलीस स्टेशन गु.र.नं. 508/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331(4), 305(a) गुन्ह्याचे तपासकामी कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करीत आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकाने पार पाडली. या पथकात पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, गणेश लबडे, फुरकान शेख, शामसुंदर जाधव, मनोज साखरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड, आकाश काळे, बाळासाहेब खेडकर, महादेव भांड, अरुण मोरे, महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत यांचा समावेश होता.