जामखेड: भीषण अपघाताने खर्डा हादरलं, बोलेरोच्या धडकेत २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू, तर एकाची प्रकृती गंभीर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : शुक्रवारी भर सकाळी शिर्डी-हैदराबाद राज्य महामार्गावरील खर्डा परिसर भीषण अपघाताने हादरला. शुक्रवारी सकाळी ९ वाजता भरधाव बोलेरो व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे.हा संपूर्ण अपघात सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जखमी तरुणावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत.

Jamkhed, terrible accident shook Kharda, 26-year-old youth died in Bolero collision, while condition of another is critical, sahil bagwan, kharda news,

मिळालेल्या माहितीनुसार, साहिल सलीम बागवान (वय २६) आणि मुस्तकीन हनीफ बागवान (वय २६) हे दोघे चुलत भाऊ खर्ड्याहून जामखेडकडे दुचाकीवरून जात होते. बळीराजा हॉटेलसमोर आले असता बोलेरो गाडी हॉटेल कडे अचानक वळली असता समोरून येणाऱ्या दुचाकी व बोलेरो गाडी मध्ये जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दोघेही तरुण हवेत उडून रस्त्यावर फेकले गेले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

युवा नेते महालिंग कोरे व स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना जामखेड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी मुस्तकीन बागवान याला उपचारासाठी दाखल केले, तर साहिल बागवान याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुस्तकीन याची प्रकृती चिंताजनक असून पुढील उपचारासाठी त्याला अहिल्यानगर येथे हलविण्यात आले आहे.

अपघातग्रस्त दोघे तरुण बटाटे व्यापारी म्हणून परिसरात प्रसिध्द होते. ऐन उमेदीच्या वयात साहिल बागवान या उमद्या तरुण व्यापाऱ्यावर काळाने घाला घातल्याने बागवान कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे खर्डा परिसर व तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे

अपघातानंतर बोलेरो चालक वाहनासह फरार झाला होता. मात्र, खर्डा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या एका तासात चालकाला वाहनासह ताब्यात घेतले. अकस्मात मृत्यूची नोंद करून या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अपघाताचा तपास खर्डा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संभाजी शेंडे, पोलिस हेड कॉन्स्टेबल शशिकांत मस्के, पोलिस कॉन्स्टेबल बाळू खाडे, वैजिनाथ मिसाळ हे करत आहेत.