जामखेड टाइम्स वृत्तसेवा । ०३ जानेवारी २०२६ । जामखेड शहरातील आरोळेनगर येथील बापलेकाने गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना आज ३ रोजी उघडकीस आली आहे. दुहेरी आत्महत्येच्या या घटनेने जामखेड शहरात मोठी खळबळ उडवून दिलीय. बापलेकाने आत्महत्या का केली ? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस या घटनेचा वेगाने तपास करत आहेत.

जामखेडच्या आरोळेनगर येथील रहिवासी असलेल्या कानिफनाथ पवार (वय ४५) व सचित कानिफनाथ पवार (वय १६) या दोघा बापलेकाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना नवीन न्यायालयाच्या शेजारील म्हाडा काॅलनीच्या लगत असलेल्या शेतात घडली. एकाच कापडाने दोघांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.
मयत कानिफनाथ ज्ञानदेव पवार (वय ४५) हे जामखेड शहरातील आरोळेनगर भागात वास्तव्यास होते. त्यांची पत्नी तीन दिवसांपूर्वी माहेरी गेलेली होती. घरात ते व त्यांचा मुलगा सचित असे दोघेच होते. दोघा बापलेकात घरगुती कारणातून शुक्रवारी रात्री वाद झाला होता, त्यातून सचित हा घराबाहेर पडला. त्यानंतर कानिफनाथ यांनी त्याचा रात्रभर शोध घेतला. तो मिळून आला नाही.
त्यानंतर पहाटे पुन्हा सचितचा शोध घेतला असता तो म्हाडा काॅलनी लगतच्या एका शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. सचित याच्या मृत्यूचा धक्का सहन झाल्यामुळे त्याच्या वडिलांनाही त्याच झाडाला त्याच दोरीने गळफास घेत आत्महत्या केली असावी अशी शक्यता पोलिस सुत्रांनी वर्तवली आहे.
मयत बाप लेकाने नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली ? दोघात नेमका कोणत्या कारणातून वाद झाला होता का ? ही आत्महत्या आहे की घातपात या दृष्टीने जामखेड पोलिस वेगाने तपास करत आहेत. पोलिसांच्या तपासात काय उघड होते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.