जामखेड : जमिनीवर पाय आणि विकासाचे व्हिजन असलेल्या प्रशांत शिंदेंना जिल्हा परिषदेत पाठवा – ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांचे अवाहन
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख : जातीपातीच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना सोबत घेऊन काम करणारा प्रशांत भाऊ शिंदे हा उच्चशिक्षित तरूण जवळा गावाच्या विकासासाठी झटतोय, पुर्ण वेळ देतोय, पण आता या कर्तृत्ववान कार्यकर्त्याला गावात थांबवून जमणार नाही, जवळा परिसर आणि जामखेड तालुक्याच्या विकासात भरीव योगदान देण्यासाठी विकासाचे व्हिजन असलेल्या या कर्तृत्ववान कार्यकर्त्याला जिल्हा परिषदेत पाठवावे लागेल, त्यासाठी चांगल्या माणसाला साथ देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. जवळेकरांनी एकजुटीने प्रशांत शिंदेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे अवाहन विनोदाचार्य ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांनी केले.

महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे व भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जवळा येथे प्रशांत भाऊ शिंदे मित्र मंडळाच्या वतीने नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.तसेच विनोदाचार्य ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांच्या जाहीर हरि किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.

“महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. सालगड्याचा मुलगा ते सभापती हा त्यांचा प्रवास तरूण पिढीसाठी प्रेरणादायी आहे.नेता कर्तृत्ववान असेल तर कार्यकर्तेही कर्तृत्ववान निघतात. प्रशांत भाऊ शिंदे हे त्यातील एक आहेत.आपल्या नेत्यासारखीच ते समाजाची अहोरात्र सेवा करत आहेत. समाजसेवा करणे ही सुध्दा आपल्या शास्त्रामध्ये हरिभक्ती समजली जाते. जो समाजाची निस्वार्थपणे सेवा करतो तो खऱ्या अर्थाने हरीभक्तच असतो,असे गौरवोद्गार यावेळी पठाडे महाराज यांनी काढले.”

यावेळी बोलताना पठाडे महाराज यांनी विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे साहेब व भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रशांत भाऊ शिंदे यांच्या कार्याचा गुणगौरव केला. समाजाच्या सेवेसाठी जी व्यक्ती अहोरात्र प्रामाणिकपणे काम करतेेय, त्याला पाठबळ द्या असे अवाहन त्यांनी यावेळी केले. जवळेश्वर मंदिर परिसरात पार पडलेल्या या कीर्तन सोहळ्यास शेकडो महिला, पुरूष व तरूण भाविकांची उपस्थिती होती.

यावेळी पठाडे महाराज यांनी आपल्या अमोघ वाणीतून केलेल्या कीर्तनात ‘बोले तैसा चाले त्याची वंदीन पाऊले’ या अभंगातून प्रबोधन केले.या अभंगाचा अंगीकार करण्याआधी ‘नीट बोले’ याचा समाजाने अधिक विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या समाजात नीट बोलण्याची पध्दत खंडित होत चालली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. आपल्या माणसांविषयी नीट बोलले पाहिजे. नाहक जळकी वृत्ती काही कामाची नाही, असे ते म्हणाले.

“स्वप्न मोठी असावीत, ते पुर्ण करण्यासाठी प्रयत्नशील रहा. जगात कोणीच कोणाचं प्रारब्ध बघितलेलं नाही. सर्वसामान्य माणसं शून्यातून मोठी होतात, त्याला प्रयत्न आणि प्रारब्ध याची जोड लागते. तुमचे स्वप्न जर संप्रदायाला धरून असतील तर यश आल्याशिवाय राहणार नाही. ज्याचे पाय जमिनीवर आहेत त्याला ढासळण्याची भिती नसते. प्रशांतभाऊ हा जमिनीवर पाय असलेला कार्यकर्ता आहे. आजवर आपण दुसर्यांनाच मोठं करत आलोत, परंतू,आता समाजाच्या सेवेसाठी अहोरात्र प्रामाणिकपणे काम करणाऱ्या या कर्तृत्ववान माणसाला मोठं करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन करत पठाडे महाराज यांनी प्रशांत शिंदे यांच्या सामाजिक सेवाकार्याचे कौतुक केले.”

सभापती प्रा.राम शिंदे व प्रशांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पठाडे महाराजांनी ‘अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा’ या नामदेव महाराजांच्या ओळींचा दाखला दिला. या ओळींचा अर्थ सांगताना ते म्हणाले ‘अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा’ म्हणजे त्या कुळामध्ये किंवा त्यांच्या वंशांमध्ये गावाची सेवा, धर्माची सेवा, आपल्या माणसांची सेवा, मातीची सेवा करणारे समाजसेवक रत्न पुन्हा पुन्हा घडत रहावे ही अखंड मागणी नामदेवरायांनी केलेली आहे असे म्हणत त्यांनी दोन्ही नेत्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला.
भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे यांचं काम पोस्टरवर नाही, तर लोकांच्या नजरेसमोर आहे.मागील दहा वर्षांत सेवा, विकास आणि विश्वास या त्रिसूत्रीवर काम करत त्यांनी जवळा गावात अमुलाग्र बदल घडवलाय, त्यांना आता गावात थांबून चालणार नाही. जवळा परिसर आणि तालुक्याच्या विकासासाठी त्यांना जिल्हा परिषदेत पाठवाव लागेल, अशी साद विनोदाचार्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांनी जवळा ग्रामस्थांना घातली.
“राजकारण तर सगळेच करतात; पण, जातीपातीच्या पलीकडे जाऊन, सर्वांना सोबत घेऊन, सर्वसामान्य माणसासाठी, गावासाठी, आपल्या मातीसाठी,आयुष्य झोकून देऊन दिवस-रात्र झटणारे, पूर्ण वेळ काम करणारे मोजकेच असतात यामध्ये भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे यांचा समावेश अग्रक्रमाने होतो, अश्या कर्तृत्ववान युवा कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, असे यावेळी पठाडे महाराज म्हणाले.”
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे, भाजपा तालुका उपाध्यक्ष पांडुरंग उबाळे, जवळा सरपंच सुशील आव्हाड, चोंडीचे चेअरमन विशाल भैय्या भांडवलकर, बावीचे सरपंच राम पवार, माजी उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर, बोरला सरपंच जालिंदर चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य राहुल पाटील, सुभाष आप्पा रोडे, रफीक भाई शेख, कल्याण आव्हाड, हरिदास आप्पा हजारे, प्रेम आव्हाड, किसन सरोदे, कांतिलाल महारणवर, पत्रकार संतराम सूळ, भाजपा युवा नेते डॉ दीपक वाळूंजकर, युवा नेते प्रशांत बापू पाटील, सावता ग्रुप अध्यक्ष प्रमोद कोल्हे, डॉ ईश्वर हजारे, तसेच ज्येष्ठ नेते हबीब शेख, युवा नेते अमोल हजारे, ज्योतिराम चव्हाण, जीवन रोडे, अजित लेकुरवाळे, अमोल पाटील, जाफर शेख, संदीप कोल्हे, शुभम हजारे, लखन हजारे, सुभाष धोत्रे, अशोक हजारे, अमित कोरे, युवा उद्योजक तुषार काढणे,सह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.