जामखेड : तेलंगशीत विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे; राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : आजच्या युगात मुलींनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या समग्र शिक्षा योजनेअंतर्गत, जामखेड तालुक्यातील तेलंगशी येथे १० दिवसीय ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा मोठ्या उत्साहात समारोप झाला.

Jamkhed, Now girls will be super strong, Self-defense lessons for Telangashi students, Rani Lakshmibai self-defense training camp concludes with enthusiasm,

जामखेड तालुक्यातील तेलंगशीत आयोजित ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण’ शिबिरात आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक संतोष थोरात यांनी विद्यार्थिनींना योगाची ओळख, अर्थ आणि महत्त्व यावर मार्गदर्शन केले.

यामध्ये  मानवी शरीररचना आणि शरीरक्रिया, किशोरवयीन आरोग्यासाठी योग जीवनशैली आणि शिस्त, श्वसन अभ्यास, प्राणायाम आणि सूर्यनमस्काराचा सखोल सराव, एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यान आणि ताकद वाढवणारी विविध आसने या विषयांवर विद्यार्थिनींना प्रशिक्षित करण्यात आले, ज्यामुळे त्यांच्यात शारीरिक आणि मानसिक बळ निर्माण होण्यास मदत झाली.

या शिबिराचा समारोप नुकताच झाला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले. ते म्हणाले की, “या १० दिवसांच्या प्रशिक्षणामुळे तुमची बुद्धी आणि शरीर अधिक तंदुरुस्त होण्यास मदत होईल. स्वतःची आत्मरक्षा करण्याची कला तुम्ही शिकला आहात. आता स्वतःसोबतच घर, परिसर आणि देशाच्या रक्षणासाठी तुम्ही सज्ज व्हायला हवे. स्वतःला एक ‘आत्मनिर्भर’ समजूनच वावरा, तरच तुमची प्रगती होईल.”

यावेळी सरपंच दिगंबर ढाळे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक संतोष थोरात, मुख्याध्यापक संतोष गोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रेवन्नाथ ढाळे, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, सदस्य अक्षय वायभासे, पोलीस पाटील अर्जुन ढाळे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे साधक प्रकाश सोनटक्के आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल शशिकांत मस्के सह आदी मान्यवर उपस्थिती होते.

​शाळेचे शिक्षक अशोक जाधव, बाळासाहेब खेडकर, मल्हारी पाखरे, संतोष खेडकर आणि रवींद्र धस यांनी हे शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे तेलंगशी परिसरातील विद्यार्थिनींमध्ये एक नवा आत्मविश्वास आणि ऊर्जा पाहायला मिळत आहे.

📢 ताज्या बातम्या मिस करू नका!
👉 जामखेड टाइम्स Channel Follow करा