जामखेड : हळगावच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयात राष्ट्रीय अँटी रॅगिंग सप्ताह साजरा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : रॅगिंग हे अक्षम्य कृत्य असून कायद्याने ही कृती गुन्हा म्हणून गणली जाते. सर्वोच्च न्यायालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगासह अनेक राज्यांनी रॅगिंग रोखण्यासाठी कडक कायदे केले आहेत. महाविद्यालयाच्या परिसरात वावरताना विद्यार्थ्यांनी शिस्तीचे पालन करावे, कोणतेही गैर कृत्य करू नये, तसेच येणाऱ्या शैक्षणिक वर्षांत महाविद्यालयात नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करावे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय सोनवणे यांनी केले.

Jamkhed, National Anti-Ragging Week celebrated at Punyashlok Ahilyadevi Holkar Government Agricultural College, Halgaon,

जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयात राष्ट्रीय अँटी रॅगिंग सप्ताह विविध उपक्रम घेत साजरा करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात सोनवणे बोलत होते.

शैक्षणिक संस्थामध्ये खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेता यावे यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने १२ ऑगस्ट राष्ट्रीय अँटी रॅगिंग दिवस व १२ ते १८ ऑगस्ट हा राष्ट्रीय अँटी रॅगिंग सप्ताह साजरा करण्याचे निर्देशित केले आहे. त्यानुसार हळगाव कृषि महाविद्यालयात अँटी रॅगिंग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. महेश निकम यांनी वसतिगृहात शिस्तीचे पालन करून खेळीमेळीच्या वातावरणात वास्तव्य करावण्याचे आवाहन केले. तसेच, अँटी रॅगिंग अर्ज भरण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्रा. अर्चना महाजन यांनी रॅगिंग म्हणजे काय, ॲन्टी रॅगिंग कायदा तयार करण्यामागची पार्श्वभूमी समजावून सांगितली. विद्यार्थी परिषद सभापती कु. अनिकेत मिंड यांनी रॅगिंग विरोधी कायदे स्पष्ट केले. कु. रसिका पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी विद्यार्थी परिषद उपाध्यक्ष डॉ. प्रेरणा भोसले, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. पोपट पवार, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विवेकानंद कुलकर्णी, वनस्पती रोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मनोज गुड, वसतिगृह कुलमंत्री डॉ. महेश निकम, उप कुलमंत्री प्रा. अर्चना महाजन, डॉ. निलेश लांडे, डॉ. धनेश्वर पाटील आदी उपस्थित होते.  

कार्यक्रमा दरम्यान, विद्यार्थ्यांना लघुपटाद्वारे अँटी रॅगिंगची इत्यंभूत माहिती दाखवून ॲन्टी रॅगिंग वेबसाईट, टोल फ्री क्रमांक, तक्रार नोंदणी प्रक्रिया इत्यादी बाबींबद्दल जागृत करण्यात आले. महाविद्यालयात अँटी रॅगिंग सप्ताहाचे औचित्य साधून भित्तीचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अर्चना महाजन यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.