जामखेड नगरपरिषद निवडणूक २०२५ : नगरसेवकपदासाठी १२१ तर नगराध्यक्षपदासाठी १३ उमेदवारी अर्ज वैध, कोणता उमेदवार कोणत्या प्रभागातून रिंगणात? पहा संपुर्ण यादी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख । जामखेडच्या राजकारणात सोमवारचा दिवस अतिशय नाट्यमय ठरला. सस्पेन्स चित्रपटाला लाजवेल अश्या रहस्यमय घडामोडी सोमवारी दिवसभर घडल्या. भाजप, राष्ट्रवादी सह इतर पक्षांनी आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा न करता थेट उमेदवारी अर्ज दाखल केले. एबीफाॅर्म अतिशय गुप्तपणे जोडले गेले. मात्र मंगळवारी अर्ज छाननी नंतर सर्वच चित्र स्पष्ट झाले आणि तथाकथित सस्पेन्स संपला.

Jamkhed Nagarparishad Election 2025,121 candidatures for post of nagarsevak and 13 for post of nagaradhyaksha are valid, which candidate is in fray from which ward? See complete list

जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक यंदा थेट जनतेतून होत आहे. या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे संपुर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले होते. शेवटच्या क्षणापर्यंत भाजप व शरद पवार राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर मंगळवारी यावर पडदा पडला. भाजपने नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या पत्नी प्राजंलताई चिंतामणी यांच्या उमेदवारीची घोषणा केली. तर राष्ट्रवादीने माजी जिल्हा परिषद सदस्या संध्या शहाजी राळेभात यांची उमेदवारी जाहीर केली. शिवसेना शिंदे गटाने उद्योजक आकाश बाफना यांच्या पत्नी पायल बाफना यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीने सुवर्णा महेश निमोणकर यांना उमेदवारी दिली आहे.

नगराध्यक्षपदासाठी २५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यामधील ९ अर्ज बाद झाले. तर ३ अर्ज दुबार दाखल करण्यात आले होते.अर्ज छाननीनंतर नगराध्यक्षपदासाठी १३ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये जैन वाहेद कुरेशी, प्रांजल अमित चिंतामणी, सुवर्णा महेश निमोणकर,पायल आकाश बाफना, प्रिती विकास राळेभात, प्रियंका दिनेश राळेभात, संध्या शहाजी राळेभात, परवीन सिराजुद्दीन शेख, रहीमुन्नीसा कमाल शेख, रेश्मा युनुस शेख, शहेनाज नय्यूम शेख, वर्षा कैलास माने, नसीम बागवान या १३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

जामखेड नगरपरिषदेसाठी यंदा १२ प्रभागातून २४ उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. या निवडणुकीसाठी एकुण २१९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज छाननीत ८२ जणांचे उमेदवारी अर्ज बाद ठरले. तर यामध्ये १६ जणांचे दुबार नामांकन आले होते. अर्ज छाननीनंतर १२१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

जामखेड नगरपरिषद निवडणूकीत महायुती न झाल्याने भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी स्वतंत्र निवडणूक रिंगणात उतरली आहे. तर महाविकास आघाडीतही बिघाडी झाली आहे. काँग्रेसने आघाडीतून बाहेर राहत मोजक्या ठिकाणी उमेदवार दिले आहेत. उध्दव ठाकरे गटाला अवघ्या दोन जागा देण्यात आल्याने ठाकरे गटाचे अस्तित्व नगण्य असणार आहे. तिसऱ्या आघाडीचा बार फुसका ठरला आहे. अर्ज माघारीनंतर निवडणूकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. तुर्तास ज्या पक्षांनी सर्व उमेदवार रिंगणात उतरवले आहेत त्या पक्षांच्या उमेदवारांकडून प्रचारास प्रारंभ करण्यात आला आहे. या निवडणुकीत किती अपक्ष निवडणूक रिंगणात राहतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

जामखेड नगरपरिषद निवडणूकीत खरी लढाई विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे विरूध्द आमदार रोहित पवार यांच्यात होणार असे प्रथमदर्शनी दिसत होते, परंतू या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी स्वतंत्रपणे उमेदवार रिंगणात उतरवल्या ही निवडणूक वेगळ्या वळणावर गेली आहे. शिवसेना व राष्ट्रवादी (अजित पवार) या निवडणुकीत कोणाला डॅमेज करणार? कोणाला फायदा पोहोचवणार याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. तूर्तास ही निवडणूक राज्यात अनेक अर्थाने गाजणार असेच दिसत आहे.

सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत प्रशासनाने दाखल उमेदवारी अर्जाची माहिती सार्वजनिक केली नाही. मंगळवारी ही माहिती जाहीर होईल असे वाटत असताना सर्वांचेच अंदाज चुकवत प्रशासनाने थेट अर्ज छाननीनंतर उमेदवारांची माहिती सार्वजनिक केली. प्रशासनाच्या कासवगतीमुळे सोमवारी दुपारनंतर सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला होता. मंगळवारी सर्व रहस्यमय घडामोडींवर पडदा पडला. कोणता उमेदवार कोणत्या पक्षाकडून लढणार हे चित्र स्पष्ट झाल्यानंतर शहरातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे.