जामखेड नगरपरिषदेच्या उमेदवारीचा तिढा कायम, सर्वपक्षीय इच्छुकांमध्ये अस्वस्थता, 48 तासांत होणार मोठ्या उलथापालथी ! जामखेडमध्ये काय घडतयं ?वाचा सविस्तर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख । जामखेड नगरपरिषद निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस बाकी राहिले आहेत.अत्तापर्यंत तीन जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.भाजपसह सर्व राजकीय पक्षांनी अजूनही आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही. यामुळे सर्वपक्षीय इच्छुकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. इच्छूकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारीचा तिढा सोडवण्यासाठी मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला सुरू आहे. येत्या ४८ तासांत मोठ्या उलथापालथी होणार आहेत. प्रमुख राजकीय पक्षांनी गुप्तता पाळल्याचे चित्र असले तरी इच्छूकांनी बी प्लॅन तयार ठेवलाय, सोमवारी उमेदवार अर्ज दाखल होण्याचा मोठा विक्रम होऊ शकतो, अशी दाट शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे.

जामखेड नगरपरिषद निवडणूकीचा रणसंग्राम चांगलाच तापलाय. इच्छूकांनी आपापल्या प्रभागात जोरदार मोर्चेबांधणी केलीय. जनतेपर्यंत आपला चेहरा पोहचवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करत धुराळा उडवून दिला आहे. निवडणूक जाहीर होताच अनेक फुसके इच्छूक फिक्स नगरसेवक व फिक्स नगराध्यक्ष म्हणून मिरवू लागलेत. तर काही सुपारीबाजांना अचानक आपापल्या समाजाचा कळवळा आलाय. सेटलमेंट बहाद्दर समाजा समाजात विषपेरणी करून जनतेची दिशाभूल करताना दिसत आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीत या सुपारीबाजांचा बाजार उठवण्याचा जनतेचा मुड असल्याचेच चित्र ग्राऊंडवर दिसून येत आहे. कायम जनतेत राहून काम करणाऱ्यांना राजकीय पक्षांनी उमेदवारीची संधी न दिल्यास या पक्षांनाही जनता धडा शिकवू शकते, अशी जामखेड शहराची स्थिती आहे.
जामखेड नगरपरिषदेसाठी १२ प्रभागातून २४ उमेदवार निवडून द्यायचे आहेत. तर जनतेतून नगराध्यक्ष निवडून द्यायचा आहे. एकुण २५ जागांसाठी होणारी ही लढाई पुर्ण ताकदीने लढण्याची सर्व तयारी राजकीय पक्षांची असल्याची बतावणी केली जात आहे. परंतू या लढाईचा ट्रेलर अजून समोर आलेला नाही. उमेदवारांची घोषणा न झाल्याने सर्वपक्षीय इच्छूक अस्वस्थ आहेत. महायुती अथवा महाविकास आघाडीची अद्याप घोषणा झालेली नाही. युतीची पहिली फेरी निष्फळ ठरली;पण कधीही काहीही घडू शकते. राष्ट्रवादी शरद पवार गट महाविकास आघाडी न करता स्वतंत्र लढणार असेच दिसते. काँग्रेस तिसऱ्या आघाडीच्या माध्यमांतून रिंगणात उतरणार आहे. इतर छोटे पक्ष आपले नशिब आजमवण्याची शक्यता आहे.
जामखेडचा नगराध्यक्ष कोण होणार ? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. भाजप व राष्ट्रवादीकडून कोण रिंगणात उतरणार ? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. पण इतर पक्षही आपले पत्ते ऐनवेळी उघडू शकतात. नगराध्यक्षपदाची निवडणूक एकास एक न होता बहुरंगी होण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकीत जो उमेदवार शहराच्या विकासाचे व्हिजन जनतेला देईल तोच उमेदवार जनतेच्या पसंतीस उतरेल, समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या शहराला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्याची धमक असणाऱ्या नेतृत्वावर जनता या निवडणुकीतून शिक्कामोर्तब करणार असल्याने ही निवडणूक विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे व आमदार रोहित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.
जामखेड नगरपरिषद निवडणुकीत सर्वच पक्षांना उमेदवारी देताना ‘जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी’ याचा विचार करूनच उमेदवारी द्यावी लागणार आहे. जो पक्ष हे करणार नाही नाही त्या पक्षाला मोठ्या नुकसानीचा फटका बसणार यात शंका नाही. त्याचबरोबर आरक्षण असलेल्या जागेवर उमेदवार देताना राजकीय पक्षांना अत्यंत काळजीपूर्वक उमेदवारांची घोषणा करावी लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर यंदा होणारी पहिली सार्वत्रिक निवडणूक आहे. या निवडणुकीत जनता कोणाच्या बाजुने याचा फैसला होणार आहे.विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे व रोहित पवार यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. जो जनतेच्या मनात तोच उमेदवार दिला जाणार, कोणाचीही शिफारस चालणार नाही असे राम शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. शिंदे हे धक्कातंत्राचा वापर करणार का ? या निवडणुकीतून शिंदे व पवार हे कोणता पॅटर्न सेट करणार? याची सर्वांनाच उत्सुकता आहे.