जामखेड नगरपरिषद अपडेट : दुहेरी निवडीचा प्रश्न मिटला; कायद्यात सुधारणेसाठी नवा अध्यादेश, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत थेट अध्यक्ष आणि सदस्य म्हणून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीस एकाच वेळी दोन्ही पदे धारण करता यावीत यासाठी राज्य सरकारने थेट कायद्यात दुरूस्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.या निर्णयाचा थेट लाभ जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी यांना होणार आहे. त्यांची दोन्ही पदे अबाधित राहणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे चिंतामणी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बुधवारी (२४ डिसेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत नगरपरिषदा, नगरपंचायतीमध्ये थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व आणि मताचा अधिकार देण्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी सरकारकडून नवा अध्यादेश काढला जाणार आहे.
कायद्यात होणाऱ्या या नव्या बदलामुळे जामखेडसह राज्यातील अनेक नगरपरिषदा आणि नगरपंचायतीत एकाच वेळी अध्यक्ष व सदस्य म्हणून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे दोन्ही पदे कायम राहणार आहेत. यापुर्वी अश्या परिस्थितीत एका पदाचा राजीनामा देणे बंधनकारक होते. परंतू आता नव्या सुधारणांमुळे ही अडचण दुर होणार आहे. लोकप्रतिनिधींचे दोन्ही पदे अबाधित राहणार आहेत.
नव्या अध्यादेशाबाबत सरकारने म्हटले आहे की, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असलेली व्यक्ती अध्यक्ष म्हणून निवडून येण्यास पात्र असते. त्यामुळे एखादी व्यक्ती अध्यक्ष म्हणून आणि त्याचवेळी सदस्य म्हणून निवडून येऊ शकते आणि दोन्ही पदावरही निवडून येऊ शकते. अशा व्यक्तीला दोन्ही पदांसाठी जनादेश मिळालेला असतो. म्हणूनच सदस्यांमधून अध्यक्ष म्हणून निवडून आलेली व्यक्ती सदस्य राहते आणि त्याचबरोबर अध्यक्ष व सदस्य म्हणूनही काम करते.
थेट निवडून आलेल्या आणि सदस्यांमधून निवडून आलेल्या अध्यक्षास जनादेश असतोच. त्यामुळे या सुधारणेनुसार आता अध्यक्ष म्हणून थेट निवडून आलेली व्यक्ती आणि सदस्य म्हणून थेट निवडून आलेली व्यक्ती एकाचवेळी दोन्ही पदे धारण करू शकते, अशी सुधारणा नव्या अध्यादेशात करण्यात येणार आहे.
या अध्यादेशानुसार अध्यक्षाला सदस्य म्हणून एक मत देण्याचा अधिकार मिळणार आहे. अशा व्यक्तीला अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून एक मत देण्याचा अधिकार असेल आणि मतांची बरोबरी झाल्यास, अध्यक्षाला निर्णायक मत देण्याचा अधिकार राहणार आहे, अशी सुधारणा या अधिनियमात केली जाणार आहे. त्याबाबतचा अध्यादेश काढण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रांजलताई चिंतामणी ह्या थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून आणि एका प्रभागातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. जुन्या नियमानुसार चिंतामणी यांना नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा लागला असता परंतू कायद्यातील नव्या दुरुस्तीमुळे त्यांची दोन्ही पदे अबाधित राहणार आहेत. यामुळे चिंतामणी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.