जामखेड : निवडणूक लांबली, पण इच्छूकांची गर्दी कायम; सोशल मीडियावर ‘चमकोगिरीचे राजकारण’ शिगेला, जनता वैतागली

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीची धामधूम सध्या रंगात आली आहे.तर ग्रामीण महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका कधी जाहीर होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. परंतू या निवडणूका लांबणीवर गेल्याचे सध्याचे चित्र आहे. यामुळे इच्छूकांचा पुरता हिरमोड झाला आहे. परंतू राजकीय अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी इच्छूकांची सोशल मीडियावर जोरदार चमकोगिरी सुरू आहे. याच चमकोगिरीला जामखेड तालुक्यातील जनता पुरती वैतागली असल्याचे सध्या चित्र आहे.

Jamkhed, jilha parishad panchayat samiti Elections delayed, but crowds of aspirants remain, Politics of glamour at its peak on social media, public outraged, election 2026,

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ३१ जानेवारी अखेर घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नगरपरिषद, नगरपंचायत व नगरपालिकांच्या निवडणूका पार पडल्या. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात महानगरपालिकांचा निवडणुक कार्यक्रम सध्या सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यातील जिल्हापरिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूकीचा कार्यक्रम कधी जाहीर होणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. परंतू जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमध्ये आरक्षण काढताना ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याने २० जिल्हा परिषदांसह २११ पंचायत समित्यांची निवडणूक लांबली आहे. 

आरक्षणाची ५० टक्क्याहून अधिक मर्यादा अनेक ठिकाणी ओलांडली गेल्याने एकाच टप्प्यात या निवडणूका होण्याची शक्यता कमी आहे. या निवडणूका दोन टप्प्यात होण्याची शक्यता अधिक आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणूका नव्या वर्षाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश जवळपास नसणार आहे. यामुळे इच्छूकांचा पुरता हिरमोड झाला आहे.

गेल्या काही वर्षांपासून नगर जिल्हा परिषदेत प्रशासकराज आहे. सर्वच पक्षातील इच्छूक निवडणुकीसाठी सज्ज आहेत. परंतू निवडणुक लागणार की लांबणार ? याची निश्चित दिशा स्पष्ट नसल्याने इच्छूक अस्वस्थ आहेत. मागील काही दिवसांपासून गावभेट दौर्‍यावर असलेल्या इच्छूकांनी आता आपल्या तलवारी म्यान करत संपर्क दौरे थांबवले आहेत. मध्यंतरी गावागावात इच्छूकांचे जथ्थेच्या जथ्थे चमकताना दिसत होते. निवडणूक लांबणीवर जाताच इच्छूकांनी नियोजित दौरे, कार्यक्रम रद्द करत आता फक्त सोशल मिडीयावर चमकोगिरी हाती घेतलीय. इच्छुकांकडून सोशल मीडियावर होत असलेल्या भडीमारामुळे जनता पुरती वैतागून गेली आहे.

इच्छूक उमेदवारांनी सोशल मीडियावर पोस्ट आणि रिल्सचा नुसता धडाका लावला आहे. यात जिल्हा परिषद गटाचा, पंचायत समिती गणाच्या विकासाचे व्हिजन मांडताना कोणीही दिसत नाही. स्वता:च्या फोटोतून आपल्या उमेदवारीची दावेदारी करण्याची धन्यता मानताना इच्छूक दिसत आहेत. मोजक्या इच्छूकांनी विविध सामाजिक उपक्रम राबवत आपला चेहरा जनतेत चर्चेत ठेवला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निवडणूका झालेल्या नाहीत. निवडणुकीला सामोरे जाताना गट आणि गणाच्या प्रश्नांची मांडणी करताना कोणताच इच्छूक उमेदवार दिसत नाही. गट व गणातील समस्यांच्या सोडवणूकीसाठी हाताच्या बोटावर मोजण्या इतके (तेही अल्प) इच्छूक काम करत आहेत. त्यात काहींना यश तर काहींना अपयश येत आहे.

एकाच पक्षात अनेक इच्छूक असणे ही बाब लोकशाहीसाठी चांगली असली तरी हे इच्छूक आपल्याच पक्षातील इतर इच्छूकांना डॅमेज करण्यासाठी वेगवेगळ्या रणनिती राबवत आहेत. शहकटशहाच्या राजकारणामुळे इच्छूकांच्या प्रतिमा मलिन होत आहेत. काही इच्छूकांनी ऐकमेकांविषयी टोकाचा द्वेष पेरला आहे. इच्छूकांच्या या वागण्यामुळे राजकीय पक्षांची प्रतिमा मलिन होऊ लागल्या आहेत. या सर्व घडामोडींना आवर घालणे आणि पक्षाचे सकारात्मक वातावरण जनतेत घेऊन जाणे हे मोठे अव्हान सर्वच राजकीय पक्षांसमोर असणार आहे. नव्या वर्षांत इच्छूकांकडून नवा बदल पहायला मिळणार का? की पुन्हा गटबाजीला उधाण येणार ? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

जामखेड तालुक्यात ३ जिल्हा परिषद गट व सहा पंचायत समिती गण आहेत. जामखेड तालुक्यातील अनेक महत्वाचे नेते कार्यकर्ते निवडणुक लढवण्याच्या तयारीत आहेत.  प्रत्येक जण आपल्यालाच तिकीट मिळणार या अविर्भावात काम करत आहे. विशेष म्हणजे जनाधार नसलेले काही हवसे नवसे गवसे इच्छूक झालेत. यामुळे या निवडणुकीत इच्छूकांचा भरणार अधिक असणार आहे. निवडणूक चौरंगी तिरंगी पंचरंगी झाल्यास नवल वाटू नये अशी सध्याची परिस्थिती आहे. तुर्तास निवडणूक लवकर जाहीर व्हावी यासाठी इच्छूकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.