​जामखेड : शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घालणारा भामटा जेरबंद, खर्डा पोलिसांची मोठी कारवाई

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : ऊसतोडणी हंगामासाठी मजूर पुरवण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून पकडण्याची धडाकेबाज कारवाई खर्डा पोलिसांनी पार पाडली.अटकेतील आरोपी हा जळगाव जिल्ह्यातील असून त्याने जामखेडसह सोलापुर व बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गंडा घातल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

Jamkhed, fraudster who cheated farmers of lakhs of rupees was arrested, Kharda police took major action, jadhavrao Chandan pardeshi, Kharda news today,

जामखेड तालुक्यातील वाकी येथील शेतकरी हरिदास तुकाराम शेळके, दादा सौदागर कोरडे, राजकुमार अर्जुन सावंत, वाल्मिक शंकर पवार आणि राहुल मनोहर रोडे यांना २०२५-२६ च्या गळीत हंगामासाठी मजुरांची आवश्यकता होती. याचाच फायदा घेत आरोपी जाधवराव चंदन परदेशी (रा. घुसर्डी खु.,ता.भडगाव, जि.जळगाव) याने या शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला.

​केवळ शब्दावरच नव्हे, तर चक्क १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करून त्याने मजुरांच्या टोळ्या देण्याचे आश्वासन दिले. या बदल्यात त्याने शेतकऱ्यांकडून वेळोवेळी रोख आणि फोन-पे द्वारे एकूण ३८ लाख १५ हजार रुपये उकळले. मात्र, पैसे घेऊनही एकही मजूर न देता त्याने आपला फोन बंद केला आणि तो फरार झाला होता.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी खर्डा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. १० फेब्रुवारी २०२६ रोजी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३१६(२) आणि ३१८(४) नुसार गुन्हा (रजि. नं. १९/२०२६) दाखल केला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी जाधवराव परदेशी हा नागद (ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) येथे लपून बसल्याचे समजले. पोलिसांनी सापळा रचून त्याला तिथून ताब्यात घेतले.

​आंतरजिल्हा फसवणुकीचे धागेदोरे

​प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आरोपीने केवळ जामखेडच नव्हे, तर करमाळा (जि. सोलापूर) आणि आष्टी (जि. बीड) येथील शेतकऱ्यांनाही मजूर देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांना गंडा घातल्याचा कबुली दिली आहे. यावरून हे एक मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

​ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीस स्टेशनचे प्रभारी सपोनि उज्वलसिंह राजपूत, पोलीस अंमलदार संभाजी शेंडे, राहुल शिंदे, शशी म्हस्के, विष्णू आवारे, अशोक बडे आणि बाळू खाडे यांच्या पथकाने केली.

​सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि उज्वलसिंह राजपूत हे करत आहेत. शेतकऱ्यांनी अशा प्रकारे अनोळखी व्यक्तींना मोठी रक्कम देताना सावध राहावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.