जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील धनेगाव येथून वाहणार्या खैरी नदीला सोमवारी महापुर आल्याने ढाळे वस्तीवरील चौघे जण पुरात अडकले होते. त्या सर्वांची प्रशासन व स्थानिकांनी सुखरूप सुटका केली.

रविवारी रात्री बालाघाटात तुफान पाऊस कोसळला. त्यामुळे सोमवारी पहाटेपासून बालाघाटातील सर्व नद्यांना महापुर आला होता. सोनेगाव धनेगाव भागाची जीवनदायिनी असलेल्या खरी नदीला महाप्रचंड असा महापुर आला होता नदीकाठी आसलेल्या बाळासाहेब ढाळे यांच्या कुटुंबातील रंगनाथ ढाळे वय 68, बाबुराव बाळासाहेब ढाळे वय 21, मंगल बाळासाहेब ढाळे वय 45 वर्षे, व बाळासाहेब ढाळे वय 53, असे एकाच कुटुंबातील चौघे जण अडकले होते. त्यांच्या घराला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास नदीच्या पुराने वेढा घातला व हे कुटुंब रात्रभर पाण्यात आडकुन पडले. रात्रभर ढाळे कुटुंब हे जागेच होते. तसेच घरात देखील पुराचे पाणी गेल्याने मोठ्या प्रमाणावर जिवनावश्यक वस्तुंचे नुकसान झाले.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच तहसीलदार मच्छिंद्र पाडळे, साहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, शाखा अभियंता गणेश काळे, सुजित गोडगे, तलाठी विकास मोराळे सर्कल नंदकुमार गव्हाणे, पोलीस कॉन्स्टेबल बिराजदार, पोलीस कॉन्स्टेबल गणेश बडे सह धनेगाव येथील ग्रामस्थ व शेतकरी यांनी धाव घेत मदतकार्य हाती घेतले. पुर ओसरताच ढाळे कुटुंबातील चौघा सदस्यांची सुखरूप सुटका करण्यात आली.