जामखेड: बनावट दुधाचा कारखाना उध्वस्त, १७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, तिघांविरोधात गुन्हे दाखल, फक्राबाद येथील कारवाई
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथील छापेमारीत दुधभेसळीचा गोरखधंदा उजेडात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (१४ रोजी) बनावट दुध बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत तब्बल १७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.या प्रकरणी ३ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथील रामदास नवनाथ उबाळे हा त्याच्या दुध संकलन केंद्रामध्ये केमीकल पासुन दुध तयार करुन ते संकलन झालेल्या दुधामध्ये मिक्स करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी राजेश नामदेव बडे यांच्यासह फक्राबादमध्ये शनिवारी छापेमारी केली.
सदर ठिकाणी १) समीर कमरुद्दीन शेख वय – ३० वर्षे रा. उंबरे ता. राहुरी जि. अहिल्यानगर, २) आफताब कलीम शेख वय- २८ वर्षे रा. शुक्लेश्वर चौक, राहुरी ता. राहुरी जि. अहिल्यानगर, ३) रामदास नवनाथ उबाळे वय- ४६ वर्षे रा. फक्राबाद ता. जामखेड हे तिघे मिळुन आले.
त्यानंतर अन्न औषध प्रशान विभागाचे अधिकारी व पोलीस पथकाने दुध संकलन केंद्राची पाहणी केली असता सदर ठिकाणी दुध तयार करण्यासाठी वापरले जाणारे ६ ड्रममध्ये ११९८ लिटर Paraffin नावाचे केमीकल, दुध पावडर मिळुन आले.
सदर केमीकल बाबत ताब्यातील इसमांकडे विचारपुस केली असता त्यांनी सदरच्या केमीकल पासुन दुध तयार करण्यात येत असुन, ६ ड्रममधील केमीकल पासुन २४,०००/- लिटर दुध तयार होत असल्याचे कळवले. त्यावेळी अन्न व औषध सुरक्षा अधिकारी यांनी सदर केमीकलची पाहणी करुन सदर केमीकल पासुन मानवी शरीरास घातक असे दुध तयार होत असल्याचे कळवले आहे.
ताब्यातील इसमांच्या कब्जातुन दुध तयार करण्यासाठी वापरले जाणारे २,३९,६००/- रु. कि.चे १९९८ लिटर Paraffin Oil, ८१,०५६/- रु कि.ची प्लास्टिक बॅगमध्ये पांढ-या रंगाची ३०० किलोग्रॅम पावडर, १२,१६०/- रु कि.चे ३२० लिटर केमीकल पासुन तयार केलेले दुध, १४,००,०००/- रु कि.चे दोन पिकअप वाहन असा एकुण १७,३२,८१६/- रु कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यातील आरोपीविरुध्द जामखेड पोलीस ठाणे गु.र.नं. ८४/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २७४, २७५, १२३, ३(५) सह अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम २६(१), २६(२) (i) शिक्षा कलम ५७, ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.
फक्राबादमध्ये मानवी आरोग्यासाठी घातक असलेल्या बनावट दुधाचा गोरखधंदा किती दिवसांपासून सुरू होता? या धंद्यात जामखेड तालुक्यातील इतर कोण कोण पार्टनर आहेत का? बनावट दुध तयार करणारे आणखीन किती काळे बोके जामखेडमध्ये आहेत? या सर्वांचा उलगडा एलसीबी व स्थानिक पोलिसांना करावा लागणार आहे. मानवी आरोग्याशी जीवघेणा खेळ खेळणाऱ्या काळ्या बोक्यांचा तातडीने बिमोड करावा, अशी मागणी जोर धरत आहे.