जामखेड : पंचनामे करताना तलाठ्याला सर्पदंश, प्रा. राम शिंदेंची तातडीने रुग्णालयात धाव, तलाठ्याच्या प्रकृतीची विचारपूस करत दिला धीर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात अतिवृष्टीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर गावागावात सुरु आहे. प्रशासकीय अधिकारी कर्मचारी चिखल तुडवत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करताना दिसत आहेत. अश्यातच जामखेड तालुक्यातील धनेगाव परीसरातून आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

अतिवृष्टीग्रस्त भागात पंचनामे करण्यासाठी गेलेल्या तलाठ्याला सर्पदंश झाल्याची घटना घडली आहे. या घटनेतील जखमी तलाठ्यास ग्रामस्थांनी तातडीने जामखेडला उपचारासाठी दाखल केल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी तातडीने रूग्णालयास भेट देत संबंधित तलाठ्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. सदर रुग्णाच्या प्रकृतीची योग्य ती दक्षता व खबरदारी घेण्याच्या सुचना त्यांनी रूग्णालय प्रशासनाला दिल्या.

जामखेड तालुक्यातील धनेगाव परिसरात अतिवृष्टी व महापुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या भागात पंचनामे वेगाने सुरु आहेत. धनेगावचे तलाठी अकाश केदार (मुळ गाव पारनेर) हे आज खैरी नदीकाठच्या परिसरातील शेतकरी सुहास काळे, संदिप काळे, प्रमोद काळे यांच्या शेतात पंचनामे करण्यासाठी पायी चालले होते.
गवतातून जात असतानाच त्यांच्या पायाला सर्पदंश झाला. ही घटना आज सकाळी 11 वाजता घडली. सर्पदंश होताच त्यांना चक्कर आली. केदार यांना सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच सोबत असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना तातडीने जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनास्थळावरून केदार यांना मुख्य रस्त्यापर्यंत नेताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

दरम्यान, अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामा करण्यासाठी तलाठी आकाश काशीकेदार यांना सर्पदंश झाला असून त्यांना जामखेडच्या खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळताच विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी तातडीने हाॅस्पीटल गाठत अकाश केदार यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. केदार यांच्यावर योग्य ते उपचार करावेत. कुठलीही अडचण येऊ नये, अश्या सुचना शिंदे यांनी रूग्णालय प्रशासनाला दिल्या. तसेच तलाठी केदार यांना धीर दिला तसेच त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. घाबरू नका, सर्व ठिक होईल, असा धीर शिंदे यांनी यावेळी कुटुंबियांना दिला.