जामखेड : लाॅजमध्ये गळफास घेऊन नर्तिकेने संपवली जीवनयात्रा; शहरात उडाली खळबळ, कलाकेंद्र पुन्हा वादाच्या भोवऱ्यात!
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड शहरातील एका कलाकेंद्रावर नृत्यांगना म्हणून काम करणाऱ्या ३५ वर्षीय तरुणीने लाॅजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी खर्डा रोडवरील हॉटेल साई लाॅज येथे ही घटना घडली. दिपाली गोकुळ पाटील (वय ३५, रा. तपनेश्वर गल्ली, मूळ रा. कल्याण, ठाणे) असे मयत नृत्यांगनेचे नाव आहे.

मयत दिपाली पाटील ही गेल्या काही महिन्यांपासून आपल्या मैत्रिणींसमवेत जामखेडच्या तपनेश्वर भागात राहत होती. ती येथील एका कलाकेंद्रावर नृत्यांगना म्हणून काम करत होती. गुरुवारी (दि. ३ डिसेंबर) सकाळी “बाजारात जाऊन येते” असे सांगून ती घराबाहेर पडली. दुपारनंतर ती परत न आल्यानंतर मैत्रिणींनी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क झाला नाही.
रिक्षाचालकाने दिला महत्त्वाचा धागा
वारंवार प्रयत्न करूनही दिपाली सापडत नसल्याने तिच्या मैत्रिणींनी ती ज्या रिक्षाने बाजारात गेली होती त्या रिक्षाचालकाकडे चौकशी केली असता त्याने “दिपालीला खर्डा रोडवरील हॉटेल साई लाॅज येथे सोडले” अशी माहिती दिली.
दार उघडताच बसला सर्वांना धक्का..
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मैत्रिणी लॉजमध्ये पोहोचल्या. संबंधित रूम आतून लॉक होती. वेटरने डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडल्यावर दिपाली पाटील छताच्या पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. घटना समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.
आत्महत्येचं कारण अस्पष्ट
दिपालीने टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप कोणताही ठोस धागा मिळालेला नाही. तिची मैत्रीण हर्षदा रविंद्र कामठे हिने दिलेल्या खबरीवरून जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
जामखेडमधील कला केंद्र सातत्याने वादग्रस्त ठरत आहेत. अनेक कलाकेंद्रात अनैतिक व्यवसाय तेजीत आहेत. नाचकाम करण्यासाठी आलेल्या मुलींना बळजबरीने अनैतिक कामात ढकलले जात असल्याच्या तक्रारी आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई हाती घेण्याची आवश्यकता आहे.