जामखेड ब्रेकिंग : जामखेडमध्ये गोळीबार, गोळीबारात रोहित पवार गंभीर जखमी, 11 जणांविरोधात गुन्हे दाखल, एकास अटक
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड शहरात बुधवारी मध्यरात्री झालेल्या गोळीबार प्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात ११ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींमध्ये शुभम लोखंडे (आष्टी), उल्हास माने (जांबवाडी), अक्षय ऊर्फ चिंग्या मोरे (भवरवाडी) अर्शद सय्यद (कडा) या चौघांचा समावेश आहे. जामखेडच्या कायदा व सुव्यवस्थेला अव्हान देऊ पाहणाऱ्या घटना सतत घडत आहेत. या घटनांना आळा बसावा यासाठी सराईत गुन्हेगारांचा पोलिसांनी कायमचा बिमोड करावा अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे.

बुधवारी मध्यरात्री बारा ते साडेबारा वाजेच्या सुमारास जामखेडच्या बीड रोड भागात असलेल्या कावेरी हॉटेल येथे आठ ते दहा जणांच्या टोळीने अचानक हल्ला करत मोठा धुडगूस घातला. हॉटेलची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. तसेच हॉटेल मालक रोहित अनिल पवार (वय २७ ) याला ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. यात त्याच्या पायाला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला. यावेळी टोळक्याने हॉटेल मालकाच्या चारचाकी गाडीची सत्तुर व लाकडी दांड्याने तोडफोड केली. यात गाडीचे मोठे नुकसान झाले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे हाॅटेलमधील कर्मचारी घाबरून पळून गेले. दरम्यान गोळीबारात जखमी झालेल्या रोहित पवार याला उपचारासाठी नगर येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
हल्लेखोर आणि फिर्यादी यांच्यात जुना वाद आहे. दोन्ही गटाच्या विरोधात यापुर्वी तीन गुन्हे दाखल आहेत. आता चौथा गुन्हा दाखल झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात यातील जखमी रोहित अनिल पवार याने आरोपींना मारहाण केली होती. त्याचाच बदला घेण्यासाठी आरोपींनी कावेरी हाॅटेलची तोडफोड करत गोळीबार केल्याचे बोलले जात आहे.
चार आरोपींची ओळख पटली
जामखेड गोळीबार प्रकरणातील जखमी रोहित पवार याच्या फिर्यादीवरून ११ आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109, 189 (2), 191(2), 191(3), 190, 324(5), 351 (2) (3) सह भारतीय हत्यार कायदा कलम 3. 25 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील आरोपींची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदार जबानी आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेत पोलिसांनी चार आरोपींची ओळख पटवली आहे. यामध्ये शुभम शहाराम लोखंडे रा आष्टी, जि बीड, उल्हास विलास माने उर्फ वस्ताद रा. जाबवाडी रोड जामखेड, जि अहिल्यानगर, अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे रा भवरवाडी ता जामखेड जि अहिल्यानगर, अर्शद अमीन सय्यद रा. कडा ता आष्टी जि बीड या आरोपींचा समावेश आहे.
एकास अटक
जामखेड गोळीबार प्रकरणात निष्पन्न झालेल्या चौघा आरोपींपैकी उल्हास विलास माने उर्फ वस्ताद याला जामखेड पोलिसांनी अटक केली आहे. इतफ फरार आरोपींच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी हे करत आहेत.