जिल्हा बँकेच्या राजकीय खोडसाळपणा विरोधात जामखेड भाजप कार्यकर्ते आक्रमक, नेमकं प्रकरण काय ? वाचा सविस्तर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : भाजपची सत्ता असलेल्या अ.नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक आर्थिक ताळेबंदाच्या अहवालातून विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांचा फोटो गायब असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यामुळे भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघासह राज्यातील शिंदे समर्थकांमधून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला जात आहे.

जिल्हा बँकेच्या खोडसाळपणा विरोधात जामखेड भाजपने दंड थोपटले आहेत. सोमवारी जामखेड भाजपच्या वतीने जिल्हा बँकेचा निषेध नोंदवण्यात येणार असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे यांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
अ.नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सध्या भाजपच्या ताब्यात आहे. या बँकेने नुकताच २०२४-२५ चा वार्षिक आर्थिक ताळेबंदाचा अहवाल प्रकाशित केला आहे. यात जिल्ह्यातील अनेक नेत्यांचे फोटो छापण्यात आले आहेत. परंतू त्यात विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या फोटोचा समावेश करण्यात आलेला नाही.
विधीमंडळाच्या सर्वोच्च पदावर ते सध्या विराजमान आहेत. ते जिल्ह्यातील सुपुत्र आणि भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. भाजपची सत्ता असतानाही त्यांच्या फोटोचा समावेश बँकेच्या अहवालात करण्यात आलेला नाही. बँकेने केलेल्या राजकीय खोडसाळपणाचे पडसाद कर्जत आणि जामखेड तालुक्यात उमटू लागले आहेत. जिल्हा बँकेविरोधात भाजपा कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत.
सोमवारी सकाळी ठीक साडेदहा वाजता भाजप कार्यालय जामखेड येथे जिल्हा बँकेच्या राजकीय खोडसाळपणाचा निषेध नोंदवण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन, व्हा. चेअरमन, व सर्व संचालक तसेच भारतीय जनता पार्टी च्या सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे,असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे व शहर मंडल अध्यक्ष संजय काशिद यांनी केले आहे.