जामखेड : निष्ठावंत युवा कार्यकर्त्याच्या वाढदिवसाला सभापती प्रा राम शिंदेंकडून मोठे गिफ्ट ! नव्या दमाच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये संचारला नवा उत्साह
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख : विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे यांचे कट्टर समर्थक तथा निष्ठावंत युवा कार्यकर्ते विशाल (भैय्या) भांडवलकर यांच्या राजकीय कारकीर्दीत सोमवारचा दिवस ऐतिहासिक ठरला.सोमवारी प्रा राम शिंदे यांच्या आदेशाने चोंडी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी भांडवलकर यांच्या मातोश्रींची बिनविरोध निवड करण्यात आली. विशाल भांडवलकर यांचा रविवारी वाढदिवस होता आणि सोमवारी त्यांना प्रा शिंदेंकडून मोठे गिफ्ट मिळाले. राम शिंदे यांनी निष्ठावंत युवा कार्यकर्त्याला दिलेले राजकीय बळ जामखेड तालुक्याच्या राजकारणात नवा संदेश देणारे ठरले आहे.

राजकारणात निष्ठा ही शब्दांत मोजली जात नाही, ती वेळोवेळी सिद्ध करावी लागते. आणि नेतृत्वही त्याच क्षणी ओळखलं जातं, जेव्हा ते आपल्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेचं मोल ओळखून त्यांना योग्य वेळी राजकीय बळ व सन्मान देतं. विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी सोमवारी हेच दाखवून दिलं. भाजपाचे युवा कार्यकर्ते विशाल (भैय्या) भांडवलकर यांच्या मातोश्रींची चोंडी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी प्रा राम शिंदे यांनी बिनविरोध निवड करण्याचे आदेश दिले. हा फक्त योगायोग नाही, तर शिंदे यांच्या नेतृत्वशैलीचा स्पष्ट संदेश आहे.

कालच वाढदिवस साजरा केलेल्या विशाल भैय्यांसाठी हे ‘राजकीय गिफ्ट’ ठरलं असलं तरी, जामखेड तालुक्याच्या राजकारणात याचा अर्थ अधिक खोलवर आहे, निष्ठा जपली, तर नेतृत्वही विसरत नाही, असाच संदेश या निवडीतून समोर आला आहे. आपल्या कट्टर समर्थक आणि निष्ठावंत युवा कार्यकर्त्याला प्रा राम शिंदे यांनी दिलेले राजकीय बळ तालुक्यातील नव्या दमाच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरणारे ठरले आहे.
प्रा राम शिंदे यांची जन्मभूमी असलेल्या चोंडी गावच्या सेवा सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाची आज निवडणूक होती. या पदांसाठी प्रा राम शिंदे हे कोणाचे नाव निश्चित करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. शिंदे यांनी नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा अवलंब करत निवडणूकीच्या काही मिनिटे आधी चेअरमनपदासाठी निष्ठावंत युवा कार्यकर्ते विशाल भांडवलकर यांच्या मातोश्री वच्छला सुभाष भांडवलकर यांची तर व्हाईस चेअरमनपदासाठी बाबुराव शिंदे यांच्या नावाची घोषणा करत निवडणूक बिनविरोध करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निवडणूक बिनविरोध पार पडली.
कोण आहेत विशाल भांडवलकर?
विशाल भांडवलकर हे नव्या दमाचे संघर्षशील आणि संघटनक्षम युवा कार्यकर्ते आहेत. विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची जामखेड तालुक्यात ओळख आहे. श्री क्षेत्र चोंडीचे रहिवासी असलेले भांडवलकर शांत, संयमी आणि संघटनात कुशल म्हणून ओळखले जातात. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जोडण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले होते. त्यांच्या या निष्ठेचा सन्मान करत प्रा. शिंदे यांनी त्यांच्या मातोश्रींना चोंडी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवडून दिलं. ही केवळ नियुक्ती नसून, शिंदे यांनी नव्या दमाच्या नेतृत्वाचा पाया रचल्याचा राजकीय अर्थ या निर्णयातून अधोरेखीत होत असल्याची चर्चा जामखेडच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.