जामखेड : बारामती शेगाव एसटी बसच्या वाहकाला मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : बारामती- शेगाव या एसटी बसच्या वाहकाला मारहाण होण्याची धक्कादायक घटना जामखेड बसस्थानकावर परिसरात घडली. या प्रकरणी दोघा जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Jamkhed, Baramati Shegaon ST bus conductor beaten up, incident at Jamkhed bus stand, cases filed against two accused

याबाबत सविस्तर असे की, बारामती – शेगाव ही एसटी बस जामखेड बसस्थानकावर आली होती. त्यावेळी एक प्रवासी खिडकीतून बसमध्ये चढत असताना खिडकीतून आत का चढतो असा जाब त्या प्रवाश्याला विचारला असता, सदर प्रवाश्याने आपल्या एका साथीदारासह बस वाहकास मारहाण करत धमकी दिली. या प्रकरणी बारामती आगारात कार्यरत वाहक रफिक लतिफ शेख (वय ४०) यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शेख रफिक लतिफ हे दि. ०४ जानेवारी २०२५ रोजी बारामती ते शेगाव (जि. बुलढाणा) या मार्गावरील एसटी बस क्रमांक एमएच १४ एलएक्स ६०८३ घेऊन प्रवास करत होते. सकाळी सुमारे १०.१५ वाजता सदर बस जामखेड बसस्थानकात आली असता प्रवासी उतरतानाच अंदाजे ३० वर्षे वयाचा एक अनोळखी इसम चालकाच्या मागील खिडकीतून बसमध्ये चढला.याबाबत शेख रफिक यांनी त्याला खिडकीतून का चढलास, दरवाजातून येणे आवश्यक होते, असे समजावून सांगितले.

मात्र याच कारणावरून त्याच्या सोबत असलेल्या दुसऱ्या अनोळखी इसमाने (वय अंदाजे ३२) शिवीगाळ करत शेख रफिक यांना बसमधून खाली ओढले. त्यानंतर दोघांनी मिळून लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाण केली तसेच “बस पुढे घेऊन ये, नाहीतर पाहून घेऊ” अशी धमकी दिली. यावेळी बसचे चालक व उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले. त्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.

घटनेनंतर शेख रफिक यांनी ग्रामीण रुग्णालय, जामखेड येथे उपचार घेतले. त्यानंतर जामखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मारहाण करणाऱ्या इसमांपैकी एकाचे नाव सागर (पूर्ण नाव माहिती नाही), रा. सदाफुले वस्ती, जामखेड असे असल्याचे समजते. या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात आरोपींच्या शोधासाठी जामखेड पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. दोन्ही आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी जोर धरत आहे.