Mahakhanij Online : एम-सँड युनिट स्थापनेसाठी ‘महाखनिज’ प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : नैसर्गिक वाळूला पर्याय म्हणून कृत्रिम वाळू म्हणजेच एम-सँडच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी महसूल व वन विभागामार्फत ‘एम-सँड धोरण’ जाहीर करण्यात आले आहे. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यपद्धतीही निश्चित करण्यात आली असून एम-सँड युनिट स्थापन करू इच्छिणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी ‘महाखनिज’ या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.

Individuals and organizations wishing to set up an M-Sand unit should apply online through the mahakhanij system

पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वाळूचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यासाठी मुख्यतः नदी पात्रातील वाळू वापरली जाते. मात्र नद्यांचे पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी वाळूचा योग्य व मर्यादित वापर होणे आवश्यक आहे. त्यामुळे पर्याय म्हणून एम-सँड धोरण तयार करण्यात आले असून, त्याअंतर्गत संपूर्ण उत्पादन एम-सँडचे करणाऱ्या पहिल्या ५० युनिट धारकांना विविध सवलती देण्यात येणार आहेत.

राज्यातील रहिवासी असलेल्या व महाराष्ट्रात नोंदणीकृत व्यक्ती व संस्थांनाच या योजनेत सहभागी होता येईल. महसूल विभागामार्फत, शासकीय जमिनीवरील एम-सँडसाठीच्या खाणपट्टा लिलावामध्ये केवळ एम-सँड युनिट धारकांनाच भाग घेण्याची परवानगी असेल. पहिल्या ५० संपूर्ण एम-सँड उत्पादन करणाऱ्या युनिट धारकांना दगडाच्या स्वामित्व शुल्काची आकारणी केवळ २०० रुपये प्रति ब्रास दराने केली जाईल (सामान्य दर ६०० रुपये). लिलावातून मंजूर झालेल्या खाणपट्टा धारकांकडून लिलावात नमूद दरानुसार शुल्क आकारले जाईल.

उद्योग विभागामार्फतही युनिट धारकांना औद्योगिक प्रोत्साहन अनुदान, व्याज अनुदान, वीज दर अनुदान, विद्युत शुल्कात सवलत व मुद्रांक शुल्क माफी अशा विविध सुविधा दिल्या जाणार आहेत.

या योजनेविषयी अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील गौणखनिज शाखेशी, तसेच संबंधित उपविभागीय अधिकारी किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.