मोठी बातमी : महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण पद्धतीत बदल, नवे नियम २०२५ लागू
जामखेड टाइम्स वृत्तसेवा, दि. २३ ऑगस्ट : महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमधील जागांच्या आरक्षणाची पद्धत आणि चक्रानुक्रम निश्चित करण्यासाठी “महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम, २०२५” जाहीर केले आहेत.याआधीचे १९९६ चे नियम रद्द करून नवे नियम लागू करण्यात आले आहेत.नव्या आरक्षण नियमांनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीची आरक्षण सोडत होणार आहे. या नव्या नियमांची माहिती शासनाने राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. (Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samiti (Method of Reservation of Seats and Rotation) Rules, 2025)

निवडणूक विभाग व निर्वाचक गणांच्या संख्येमध्ये झालेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिलांसाठी जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभागांमध्ये आणि पंचायत समितीच्या निर्वाचक गणामध्ये जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम निश्चित करण्यासाठी सरकारने नवीन नियम तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत न्याय्य व पारदर्शक पद्धतीने आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी हे नियम लागू करण्यात आले आहेत. तसेच, प्रत्येक समाजघटकाला आणि महिलांना समान संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने फिरती आरक्षण सोडत पद्धत काटेकोरपणे राबविण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत अनेक मतदार विभाग व निर्वाचक गणांची आरक्षणाची रचना बदलणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय गणितांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आरक्षित जागांची सोडत जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या अधिकाराने नियुक्त केलेला तहसीलदार स्तरावरील अधिकारी काढेल. या सोडतीची सूचना जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाईल. तसेच संबंधित जिल्ह्यातील सर्वाधिक खपाच्या वर्तमानपत्रातही ती प्रसिद्ध होईल.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम, २०२५ काय आहे या नवीन नियमात ?
१. संक्षिप्त नाव :- या नियमांना महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम, २०२५ असे म्हणता येईल.
२. व्याख्या :- संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर, या नियमात –
(अ) “अधिनियम” म्हणजे महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१;
(ब) “निर्वाचक गण” म्हणजे अधिनियमाच्या कलम ५८, पोट-कलम (१) च्या खंड (अ) अन्वये निश्चित केलेला निर्वाचक गणः
(क) “मतदार विभाग” म्हणजे अधिनियमाच्या कलम १२ च्या पोट-कलम (१) अन्वये रचना केलेल्या एखाद्या जिल्ह्याचा मतदार विभागः
(ड) “लोकसंख्या” म्हणजे अधिनियमाच्या कलम २ च्या खंड (२० अ) मध्ये व्याख्या केलेली लोकसंख्या;
(इ) या नियमांमध्ये वापरण्यात आलेले परंतु व्याख्या न केलेले शब्द व शब्दप्रयोग यांना अधिनियमात अनुक्रमे जे अर्थ नेमून दिले असतील तेच त्यांचे अर्थ असतील.
३. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग आणि महिला यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या राज्य निवडणूक आयोगाने निश्चित करणे जिल्हा परिषदेच्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीसाठी, निवडणुकीद्वारे भरावयाच्या एकूण जागांपैकी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग आणि महिला यांमधील व्यक्तींकरिता राखून ठेवावयाच्या जागांची संख्या अधिनियमाच्या कलम १२ च्या पोट-कलम (२) मधील तरतुदीनुसार राज्य निवडणूक आयोग निश्चित करील.

स्पष्टीकरण. – जागांची संख्या निश्वित करताना अर्धा किंवा त्यापेक्षा जास्त अपूर्णांक आल्यास ती एक पूर्ण जागा धरण्यात येईल आणि अध्यपिक्षा कमी अपूर्णांक असल्यास तो विचारात घेतला जाणार नाही.
४. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी राखीव असलेल्या जागांच्या वाटपाची आणि चक्रानुक्रमाची पद्धत :- (१) नियम ३ नुसार, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या व्यक्तींकरिता राखून ठेवावयाच्या जागा या, ज्या मतदार विभागातील अशा जातींची किंवा यथास्थिती, जमातींची लोकसंख्या सर्वाधिक असेल अशा मतदार विभागापासून सुरूवात करून मतदार विभागांमध्ये उतरत्या क्रमाने वाटून देण्यात येतील :
परंतु, वेगवेगळ्या मतदार विभागातील अनुसूचित जातींची किंवा यथास्थिती अनुसूचित जमातींची लोकसंख्या समान असेल किंवा एखाद्या मतदार विभागात अनुसूचित जातींची आणि अनुसूचित जमातींची लोकसंख्या समान असेल, त्याबाबतीत अशा मतदार विभागांतील किंवा मतदार विभागातील जागांचे वाटप सोडत काढून करण्यात येईल :

परंतु, आणखी असे की, जेथे एखाद्या मतदार विभागातील अनुसूचित जातींची किंवा यथास्थिति, अनुसूचित जमातींची लोकसंख्या अशी असेल की, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या दोन्ही प्रवर्गासाठी तो मतदार विभाग आरक्षित होऊ शकेल, त्याबाबतीत असा मतदार विभाग अशा प्रवर्गापैकी ज्याची लोकसंख्या जास्त असेल त्या प्रवर्गासाठी राखून ठेवण्यात येईल, आणि या प्रक्रियेत, उर्वरित प्रवर्गासाठी ज्या मतदार विभागात उतरत्या कमाने पुढील सर्वाधिक लोकसंख्या असेल, तिथे त्या प्रवर्गासाठी जागा राखून ठेवण्यात येईल.
(२) पोट-नियम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, जिल्ह्यातील वेगवेगळ्या मतदार विभागांना फिरत्या पद्धतीने आरक्षण देईपर्यंत, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीं करिता राखून ठेवलेल्या जागा या, अगोदरच्या सार्वत्रिक निवडणुकीत ज्या मतदार विभागात अशा जाती किंवा यथास्थिति, जमातींसाठी जागा राखून ठेवण्यात आलेल्या नसतील अशा मतदार विभागात, पुढील निवडणुकांमध्ये फिरत्या ठेवण्यात येतील.

५. नागरिकांच्या मागासवर्गाकरिता राखून ठेवलेल्या जागांचे वाटप व चकानुक्रमाची पद्धत : (१) नियम ३ नुसार नागरिकांच्या मागासवर्गाकरिता निश्चित केलेल्या जागा या सोडत काढून मतदार विभागात वाटण्यात येतील : परंतु, सोडत काढताना अनुसूचित जातींच्या आणि अनुसूचित जमातींच्या व्यक्तींकरिता अगोदरच राखून ठेवलेल्या जागा वगळण्यात येतील.
(२) पोट-नियम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी जिल्ह्यातील मतदार विभागांपैकी प्रत्येकास फिरत्या पद्धतीने असे आरक्षण देईपर्यंत पोट-नियम (३) नुसार नागरिकांच्या मागासवर्गाकरिता राखून ठेवलेल्या जागा या, अगोदरच्या सार्वत्रिक निवडणुकीत ज्या मतदार विभागात नागरिकांच्या मागासवर्गाच्या प्रवर्गाकरिता जागा राखून ठेवण्यात आलेल्या नसतील, अशा मतदार विभागात पुढील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये फिरत्या ठेवण्यात येतील.
६. महिलांकरिता राखून ठेवलेल्या जागांचे वाटप व चक्रानुक्रमाची पद्धतः (१) नियम ३ नुसार, अनुसूचित जातींच्या, अनुसूचित जमातींच्या किंवा यथास्थिति, नागरिकांच्या मागास वर्गाच्या महिलांसाठी राखून ठेवलेल्या जागांचे ज्या मतदार विभागात अशा जाती, जमाती किंवा नागरिकांच्या मागासवर्गाकरिता जागा राखून ठेवलेल्या असतील त्या मतदार विभागात सोडत काढून नियत वाटप करण्यात येईल
परंतु, पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी सोडत काढताना, जागा राखून ठेवणे आवश्यक आहे अशा सर्व मतदार विभागांना फिरत्या पद्धतीने आरक्षण देईपर्यंत, ज्या मतदार विभागांमध्ये अशा जाती, जमाती किंवा यथास्थिति, नागरिकांच्या मागासवर्गाच्या महिलांकरिता अगोदरच्या निवडणुकीत जागा राखून ठेवलेल्या असतील ते मतदार विभाग वगळण्यात येतील.

(२) अनुसूचित जाति, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्गातील महिलांसाठी राखून ठेवलेल्या जागांचे वाटप झाल्यानंतर महिलांसाठी (अनुसूचित जाति, अनुसूचित जमाती किंवा, यथास्थिति, नागरिकांचा मागासवर्ग यांमधील महिलाव्यतिरिक्त) राखून ठेवलेल्या जागा या वेगवेगळ्या मतदार विभागात सोडत काढून वाटण्यात येतील :
परंतु, पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी सोडत काढताना सर्व मतदार विभागांना फिरत्या पद्धतीने आरक्षण देईपर्यंत, अगोदरच्या निवडणुकीत ज्या मतदार विभागात अशा जागा राखून ठेवलेल्या असतील ते मतदार विभाग वगळण्यात येतील.
७. अनुसूचित जाति, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग आणि महिला यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या राज्य निवडणूक आयोगाने निश्चित करणे: पंचायत समितीच्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीकरिता, निवडणुकीद्वारे भरावयाच्या एकूण जागांपैकी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग आणि महिला यामधील व्यक्तींकरिता राखून ठेवावयाच्या जागांची संख्या, अधिनियमाच्या कलम ५८ च्या पोट-कलम (१-ब) मधील तरतुदीनुसार राज्य निवडणूक आयोग निश्चित करील.
स्पष्टीकरण. जागांची संख्या निश्चित करताना अर्धा किंवा त्यापेक्षा जास्त अपूर्णांक असल्यास ती एक पूर्ण जागा धरण्यात येईल आणि अध्यपिक्षा कमी अपूर्णांक असल्यास तो विचारात घेतला जाणार नाही.
८. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी राखीव असलेल्या जागांच्या वाटपाची आणि चक्रानुक्रमाची पद्धत :- (१) नियम ७ नुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्याकरिता राखून ठेवावयाच्या जागा या, ज्या निर्वाचक गणातील अशा जातीची किंवा यथास्थिति, जमातीची लोकसंख्या सर्वाधिक असेल अशा निर्वाचक गणापासून सुरवात करून निर्वाचक गणामध्ये उतरत्या क्रमाने वाटून देण्यात येतील :
परंतु, वेगवेगळ्या निर्वाचक गणातील अनुसूचित जातींची किंवा यथास्थिती, अनुसूचित जमातींची लोकसंख्या समान असेल किंवा एखाद्या निर्वाचक गणात अनुसूचित जातींची आणि अनुसूचित जमातींची लोकसंख्या समान असेल, त्याबाबतीत अशा निर्वाचक गणांतील किंवा निर्वाचक गणातील जागांचे वाटप सोडत काढून करण्यात येईल :
परंतु, आणखी असे की, जेथे एखाद्या निर्वाचक गणातील अनुसूचित जातींची किंवा यथास्थिति, अनुसूचित जमातींची लोकसंख्या अशी असेल की, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या दोन्ही प्रवर्गांसाठी तो निर्वाचक गण आरक्षित होऊ शकेल, त्याबाबतीत असा निर्वाचक गण अशा प्रवगपैिकी ज्याची लोकसंख्या जास्त असेल त्या प्रवर्गासाठी राखून ठेवण्यात येईल, आणि या प्रक्रियेत, उर्वरित प्रवर्गासाठी ज्या निर्वाचक गणात उतरत्या कमाने पुढील सर्वाधिक लोकसंख्या असेल, तिथे जागा राखून ठेवण्यात येईल.
(२) पोट नियम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, जिल्ह्यातील वेगवेगळया निर्वाचक गणांना फिरत्या पद्धतीने आरक्षण देईपर्यंत, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीकरिता राखून ठेवलेल्या जागा या अगोदरच्या सार्वत्रिक निवडणुकीत ज्या निर्वाचक गणात अशा जाती किंवा यथास्थिती, जमातीसाठी जागा राखून ठेवण्यात आलेल्या नसतील, अशा निर्वाचक गणात पुढील निवडणुकांमध्ये फिरत्या ठेवण्यात येतील.
९. नागरिकांच्या मागासवर्गाकरिता राखून ठेवलेल्या जागांचे वाटप करण्याची व चक्रानुक्रमांची पद्धत :- (१) नियम ७ नुसार नागरिकांच्या मागासवर्गाच्या प्रवर्गातील व्यक्तींकरिता राखून ठेवलेल्या जागा निर्वाचक गणांना सोडत काढून वाटून देण्यात येतील :
परंतु, सोडत काढताना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींकरिता अगोदरच राखून ठेवलेल्या जागा वगळण्यात येतील.
(२) पोट-नियम (१) मध्ये काहीही अंतर्भुत असले तरी, जिल्ह्यातील निर्वाचक गणापैकी प्रत्येकास फिरत्या पद्धतीने आरक्षण देईपर्यंत, नियम ७ नुसार नागरिकांच्या मागासवर्गाकरिता राखून ठेवलेल्या जागा या, अगोदरच्या सार्वत्रिक निवडणुकीत ज्या निर्वाचक गणात नागरिकांच्या मागासवर्गाच्या प्रवर्गा करिता जागा राखून ठेवण्यात आलेल्या नसतील, अशा निर्वाचक गणांमध्ये पुढील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये फिरत्या ठेवण्यात येतील.
१०. महिलांकरिता राखून ठेवलेल्या जागांचे वाटप करण्याची व चक्रानुक्रमाची पद्धत : (१) नियम ७ नुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा यथास्थिति, नागरिकांचा मागासवर्ग यांमधील महिलांसाठी राखून ठेवलेल्या जागा या, ज्या निर्वाचक गणामध्ये अशा जाती, जमाती किंवा नागरिकांचा मागासवर्ग याकरिता राखून ठेवलेल्या असतील त्या निर्वाचक गणात सोडत काढून नेमून देण्यात येतील :
परंतु, पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी सोडत काढताना, जागा राखून ठेवणे आवश्यक आहे. अशा सर्व निर्वाचक गणांना फिरत्या पद्धतीने आरक्षण देईपर्यत, ज्या निर्वाचक गणात अशा जाती, जमाती किंवा नागरिकांच्या मागासवर्गामधील महिलांकरिता अगोदरच्या निवडणुकीत जागा राखून ठेवण्यात आल्या असतील ते निर्वाचक गण वगळण्यात येतील.
(२) अनुसूचित जाति, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गातील महिलांसाठी राखून ठेवलेल्या जागांचे वाटप झाल्यानंतर महिलांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा यथास्थिती, नागरिकांचा मागासवर्ग यांमधील महिलांव्यतिरिक्त) राखून ठेवलेल्या जागा या, वेगवेगळया निर्वाचक गणात सोडत काढून वाटण्यात येतील :
परंतु, पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी सोडत काढताना, सर्व निर्वाचक गणांना फिरत्या पद्धतीने आरक्षण देईपर्यंत, अगोदरच्या निवडणुकीत अशा जागा राखून ठेवल्या असतील, ते निर्वाचक गण वगळण्यात येतील.
११. जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील राखीव जागांच्या संबंधात सोडत काढण्याची पद्धत :- राखीव जागांकरिता काढावयाची सोडत जिल्हाधिकाऱ्याकडून किंवा जिल्हाधिकारी प्राधिकृत करील अशा तहसिलदाराच्या दजपिक्षा कमी दर्जाचा नसेल अशा अधिकाऱ्याकडून आणि सोडत काढण्याची सूचना संबंधित जिल्हा परिषदेच्या किंवा पंचायत समितीच्या कार्यालयामधील सूचनाफलकावर प्रसिद्ध करावयाच्या सूचनेस प्रतिसाद म्हणून जे रहिवासी उपस्थित राहतील अशा संबंधित जिल्हा परिषदेच्या किंवा यथास्थिती, पंचायत समितीच्या रहिवाशांच्या उपस्थितीत काढण्यात येईल आणि सोडत काढण्याची सूचना जिल्हा परिषद किंवा यथास्थिति, पंचायत समिती क्षेत्रातील सर्वाधिक खपाच्या वर्तमानपत्रांपैकी एका वर्तमानपत्रात ती प्रसिद्ध करण्यात येईल. या नोटीशीत सोडत काढण्याचे ठिकाण, तारीख व वेळ दर्शविण्यात येईल.
१२. चक्रानुक्रमासाठी पहिली निवडणूक हे नियम अंमलात आल्यानंतर घेण्यात येणारी सार्वत्रिक निवडणूक ही या नियमानुसार जागांच्या चक्रानुक्रमासाठी पहिली निवडणूक समजण्यात येईल.