जामखेड : पाऊस तुफानी, धरण तुडुंब आणि जीवाची पर्वा न करता जागता पहारा, खैरी सिंचन प्रकल्पाचे अधिकारी गणेश काळे व टीमची कौतुकास्पद कामगिरी
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख : जामखेड तालुक्यात सध्या तुफान पाऊस कोसळतोय. खैरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या या पावसामुळे धरण वेगाने भरत असून मोठा विसर्ग सुरू आहे. अशा कठीण परिस्थितीत खर्डा सिंचन शाखेचे अधिकारी गणेश काळे आणि त्यांची टीम धरणाच्या पाणी पातळीवर जागता पहारा देताना दिसत आहे.

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धरणाच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्य बजावत असलेल्या गणेश काळे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. त्यात ते मुसळधार पावसात धरणाच्या पाणी पातळीवर लक्ष ठेवताना दिसत असून त्यांच्या या जबाबदारीची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

भरपावसात धरणे ओव्हरफ्लो होत असताना अधिकारी-कर्मचारी प्रत्यक्ष धरणावर उभे राहून परिस्थितीचे नियंत्रण करतात. धोका त्यांनाही असतो, मात्र हजारो नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे योद्धे जीव धोक्यात घालून काम करत असतात.
खैरी मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय. धरणाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. या स्थितीत धरण सुरक्षिततेसाठी खर्डा सिंचन मंडळाची टीम गणेश काळे यांच्या नेतृत्वाखाली अथक प्रयत्न करताना दिसत आहे.
या टीममध्ये विजयानंद भोसले, इंगोले गोविंद, नंदराम लटके, कुमार पाटील यांचा समावेश असून, त्यांच्या कार्याचीही प्रशंसा होत आहे.