कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, 11 ठार 2 जखमी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर सोमवारी काळजाचा थरकाप उडवणारी मोठी दुर्घटना घडली आहे. एको टॅक्सी आणि सिमेंट काँक्रिट मिक्सर ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला असून या घटनेत ११ जणांवर काळाने घाला घातला. या घटनेत अन्य दोघे जण गंभीर जखमी आहेत.

Heart-wrenching accident on Kalyan-Ahilyanagar highway, 11 dead, 2 injured

कल्याण अहिल्यानगर महामार्गावर एको टॅक्सी आणि सिमेंट काँक्रिट मिक्सर ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, इको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून गाडीचा सांगाडा ओळखणेही कठीण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पांजार पुलावर हा भीषण अपघात आज सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी झाला. ⁠इको गाडीतून मुरबाड मधील काही रहिवाशी कल्याणला जात होते. – ⁠याच दरम्यान पांजार पुलावर मोठा अपघात झाला. अपघातात एक आज्जी आश्चर्यकारक रित्या बचावली आहे.

प्रवाशांनी भरलेली इको कार महामार्गावरून जात असताना समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सरने तिला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारमधील प्रवाशांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. या कारमध्ये एकूण 12 प्रवासी होते, त्यापैकी 11 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली. एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत सर्वजण मुरबाड तालुक्यातील रहिवासी असून, ते कल्याणहून मुरबाडकडे जात होते.पुलावर एकमार्गी वाहतूक सुरू असल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मृतदेह गोविली ग्रामीण रुग्णालयात आणल्याचेही समजते. या घटनेनंतर स्थानिकांनी संताप व्यक्त करत, घाईघाईत पूल सुरू करण्यात आल्याने आणि योग्य ती खबरदारी न घेतल्याने हा अपघात घडल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी प्रशासनावर केला आहे.

अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. चक्काचूर झालेल्या कारमधून मृतदेह बाहेर काढण्याचे काम स्थानिकांनी अत्यंत जड अंतःकरणाने केले. टिटवाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.