Havaman Andaj LIVE : महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांना पावसाचा रेड व ऑरेंज अलर्ट जारी, पुढील तीन दिवस धोक्याचे मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील परिस्थितीचा आढावा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा सुरू आहे. महाराष्ट्रात २१ ऑगस्टपर्यंत पावसाची तुफान बॅटींग सुरु राहणार आहे असा हवामान अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्याअनुषंगाने राज्यातील १५ ते १६ जिल्ह्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या ३ दिवसांत घाट क्षेत्र आणि कोकणात अनेक ठिकाणी ४०० मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. येत्या ४८ तासांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाट क्षेत्र आणि कोकणात दरडी कोसळण्याची शक्यता वाढली आहे.

Havaman Andaj LIVE, Red and orange rain alert issued for 16 districts of Maharashtra, next three days are dangerous, CM Devendra Fadnavis reviews situation in maharashtra
चर्चेतल्या बातम्या

पावसासाठी अनुकूल अनेक घटक एकाच वेळी सक्रिय असल्याचे दुर्मिळ चित्र सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. या स्थितीमुळे २१ ऑगस्टपर्यंत राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी अतिवृष्टीही होऊ शकते. संततधारेसोबत कमी वेळात जास्त पावसामुळे काही ठिकाणी पूर, फ्लॅशफ्लड, दरडींच्या घटना घडू शकतात, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्टा निर्माण आहे. त्याशिवाय मान्सूनची शाखा दक्षिणेकडे सरकली आहे. यामुळे राज्यात पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील अनेक भागात सुरू असलेल्या तुफान पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.अनेक भागात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे,तर काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जण अडकले आहेत. राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट देऊन आढावा घेतला. मुंबईसह महाराष्ट्रात पावसामुळे किती नुकसान झाले आहे याची मुख्यमंत्र्यांनी सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पावसाची परिस्थिती आणि सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची त्यांनी माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यात २१ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शख्यता आहे. १५ ते १६ जिल्ह्यांना पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान झाले आहे. कोकण विभागात जास्त पाऊस झाला आहे. कोकणला रेड अलर्ट देण्यात आला आहे. कुंडलिका, जगबुडीने इशारा पातळी ओलांडली आहे. वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीवर लक्ष ठेवून आहोत.

‘मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की,नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात अतिवृष्टीने लेंडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. शिवाय लातूर, उदगीर आणि कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. काल येथे झालेला पाऊस सुमारे २०६ मिमी इतका होता. त्यामुळे रावनगाव, भासवाडी, भिंगेली, हासनाळ येथील जनजीवन प्रभावित झाले आहे. रावनगाव येथे २२५ नागरिक पुराच्या पाण्यात अडकले असून त्यापैकी अत्यंत प्रतिकूल असलेल्या ठिकाणाहून नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

‘तसंच, ‘हसनाळ येथे ८ नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. भासवाडी येथे २० नागरिक अडकले असून ते सुरक्षित आहेत. भिंगेली येथे ४० नागरिक अडकले असून ते देखील सुरक्षित आहेत. ५ नागरिक बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. मी स्वत: नांदेड जिल्हाधिकार्‍यांशी सातत्याने संपर्कात असून नांदेड, लातूर आणि बिदर असे तिन्ही जिल्हाधिकारी एकमेकांशी संपर्कात राहून बचावकार्य करत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मराठवाड्यात पावसाने घेतले सहा बळी

मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला असून, 6 जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेडच्या मुखेडमध्ये पूरामुळे 50 म्हशी दगावल्या. बीड, नांदेड आणि लातूरमध्ये सर्वाधिक नुकसान झाले. 57 मंडळांत अतिवृष्टी झाली असून, पूरग्रस्त भागात एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि मिलिट्री पथके तैनात आहेत. पुण्याहून 20 जणांची टीम नांदेडला पाठवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह आढावा बैठक घेतली.

एनडीआरएफची १ टीम, एक लष्करी पथक आणि पोलिसांची टीम समन्वयातून बचाव कार्य करत आहेत. छत्रपती संभाजीनगर येथून सैन्याची एक तुकडी सुद्धा रवाना झाली आहे. स्थानिक प्रशासनाला सातत्याने प्रभावित भागात राहून समन्वय साधण्यास सांगण्यात आले आहे.’, असे देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

१८ ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट –

रेड अलर्ट – ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा,

ऑरेंज अलर्ट- पालघर, सिंधुदुर्ग, जळगाव, संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती,

येलो अलर्ट – धुळे, नंदुरबार, नाशिक, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, अकोला, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ

१९ ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट –

रेड अलर्ट – पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा

ऑरेंज अलर्ट- रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, गडचिरोली

येलो अलर्ट – धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ

२० ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट –

ऑरेंज अलर्ट- पालघर, ठाणे, मुंबई, राडगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा,

येलो अलर्ट – रत्नागिरी, सिंदुधुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ