Havaman Andaj LIVE: राज्यात पावसाचा हाय अलर्ट, महाराष्ट्रातील अहिल्यानगरसह ३२ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेला तुफान पाऊस आजपासून पुन्हा सक्रीय होणार आहे. मागील पंधरा दिवसांत महाराष्ट्रात अतिवृष्टीने दाणादाण उडवून दिलीय. महापुराने थैमान घातले आहे. महाराष्ट्रावर अभूतपूर्व असे नैसर्गिक संकट कोसळले आहे. त्यातच आता बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यातील ३२ जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून आज यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.नागरिकांनी खबरदारी घेण्याचे अवाहन करण्यात आले. राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक भागांना महापुराचा फटका बसला आहे. लाखो हेक्टर शेती खरडून गेलीय तर सध्या लाखो हेक्टर जमीन अजूनही पाण्याखाली आहे. पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नद्यांना महापुर आल्याने बंधारे, रस्ते उध्वस्त झाले आहेत.अतिवृष्टीमुळे लहान मोठे तलाव फुटले आहेत. पाऊस जास्त झाला मात्र त्याने जलसाठ्यांच्या केलेल्या विध्वंसामुळे आगामी काळात पाण्याची समस्या निर्माण होण्याचा धोका आहे.
या ३२ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी
आज भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेने अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
सरसकट नुकसान भरपाई द्या – जनतेचा टाहो
मागील पंधरा दिवसांपासून महाराष्ट्रात अतिवृष्टीने मोठा विध्वंस केला आहे. शेतीचे तर प्रचंड नुकसान झाले आहे. गेल्या ५० ते १०० वर्षांत झाला नाही असा तुफान पाऊस काही भागात पडलाय. यामुळे शेती नेस्तनाबूत झालीय. राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारने सरसकट नुकसान भरपाई द्यावी, असा टाहो राज्यातील जनतेकडून होत आहे.
सध्या सर्वच राजकीय पक्षांचे नेते, मंत्री, आमदार. खासदार नुकसानग्रस्त भागाच्या दौर्यावर आहेत. जनतेच्या व्यथा जाणून घेताना दिसत आहेत. जनतेची मागणी लक्षात घेऊन सत्ताधारी आणि विरोधक सरसकट नुकसान भरपाई देण्यासाठी एकत्र येतील का? याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.