शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता : कर्जत जामखेडमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी १५८ कोटी ३१ लाख रुपयांचे भरीव अनुदान मंजुर- सभापती प्रा.राम शिंदे यांची माहिती
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे कर्जत-जामखेडसह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. उभ्या पिकांसह बंधारे वाहून गेले होते तसेच घरांचे प्रचंड नुकसान झाले होते. हजारो हेक्टर पीके आणि फळबागा जमिनदोस्त झाल्या होत्या. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बांधव संकटात सापडले होते. अखेर राज्य सरकारने संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपुर्वीच मोठा दिलासा दिला आहे.

राज्य शासनाने अहिल्यानगर जिल्ह्यातील ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांना एकूण ८४६ कोटी ९६ लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले असून, ही मदत दिवाळीपूर्वी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
यामध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार असून, कर्जत-जामखेडसाठी १५८ कोटी ३१ लाख रुपयांचे भरीव अनुदान मंजूर झाले आहे, अशी माहिती महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिली.
💰 कर्जत-जामखेडसाठी मंजुर झालेल्या नुकसान भरपाई निधीचा तपशील खालीलप्रमाणे
- कर्जत तालुका : ९९ कोटी ४३ लाख रुपये
- ११९ गावे, ९९,९६१ शेतकरी, ६५,५७८ हेक्टर क्षेत्र
- जामखेड तालुका : ५८ कोटी ८८ लाख रुपये
- ७७ गावे, ५७,५६६ शेतकरी, ५६,३१४ हेक्टर क्षेत्र
- अहिल्यानगर जिल्हा : ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांना एकूण ८४६ कोटी ९६ लाख रुपयांचे अनुदान जाहीर
प्रशासनाची तत्परता
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर महसूल आणि कृषी विभागांनी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण केले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने शासनास प्रस्ताव पाठविला होता. शासनाने तत्परतेने निर्णय घेऊन पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
“शेतकऱ्यांच्या परिश्रमांचा सन्मान” – प्रा. राम शिंदे
“शेतकरी हा आपल्या समाजाचा कणा आहे. नैसर्गिक संकटांनी शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना शासनाने घेतलेला हा निर्णय त्यांच्या परिश्रमांचा सन्मान आहे. दिवाळीपूर्वी ही मदत खात्यात जमा होणे म्हणजे शासनाच्या संवेदनशीलतेचे प्रतीक आहे. मी स्वतः अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा करून शेतकऱ्यांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचवल्या होत्या आणि त्याचे सकारात्मक फलित आज दिसत आहे,” असे प्रतिपादन प्रा. राम शिंदे यांनी केले.
मुख्यमंत्री व मंत्र्यांचे आभार
या निर्णयाबद्दल सभापती प्रा. राम शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.
शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर हा निधी मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने मेठा दिलासा दिला आहे. सरकारने तातडीने नुकसान भरपाई जमा करण्यास सुरूवात केल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.