जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Ganeshotsav 2025 News : महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या गणेशोत्सवानिमित्त अनेकजण कोकण तसेच राज्यभरात प्रवास करतात. या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने 367 अधिकच्या फेऱ्यांचे नियोजन केले आहे. राज्यातील गणेशभक्तांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असून त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.

या निर्णयामुळे गणेशभक्तांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. राज्य शासनाने याबाबत केंद्र सरकारकडे विशेष मागणी केली होती. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे मंत्रालयाने कोकणासह विविध मार्गांवर जादा गाड्यांचे नियोजन केले आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे दिली.
मुंबईमधून मोठ्या संख्येने कोकणात परतणारे गणेशभक्त तसेच राज्याच्या इतर भागांतून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी या अतिरिक्त गाड्या उपयुक्त ठरणार असून गणेशभक्तांच्या सोयीसाठी केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे, असे मुख्यमंत्री यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.