जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख : जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथील शेतकरी कन्या स्नेहा संतोष नागवडे हिची ACPM Medical College, धुळे येथे MBBS साठी निवड झाली आहे. शेतकरी कुटुंबातील आणि आर्थिकदृष्ट्या विपरीत परिस्थितीत वाढलेल्या स्नेहाचे घवघवीत यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. तिने गावाचे आणि जामखेड तालुक्याचं नाव उज्ज्वल केलं आहे.

जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथील स्नेहा ही संतोष भीमराव नागवडे यांची कन्या आहे. तिला दोन भाऊ आहेत. ते दहावी व आठवीत शिक्षण घेत आहेत. तिच्या कुटुंबाचा शेती हा व्यवसाय आहे, पण शेतीवर उत्पन्न कमी आणि खर्च मात्र जास्त.घरची आर्थिक परिस्थिती बेताची असूनही पालकांनी मुलीच्या शिक्षणासाठी कोणतीही तडजोड केली नाही.शेतीच्या हंगामी कामांबरोबर मजुरी करून, कधी कर्ज काढून तर कधी खर्चात काटकसर करून त्यांनी स्नेहाला शिकवलं. आई वडिलांच्या संघर्षाला जिद्दीची जोड देत स्नेहाने यशाला गवसणी घातली. स्नेहाची मेहनत आणि शेतमजुरीतून स्वप्नाची उभारणी होणार असल्याने नागवडे कुटुंब आनंदून गेलं आहे.
स्नेहाचं प्राथमिक शिक्षण वंजारवाडी गावातील प्राथमिक शाळेत झालं. त्यानंतर तिने आणखेरी देवी विद्यालय, फक्राबाद येथे विद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. पुढे अरणेश्वर विद्यालय, अरणगाव येथे उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. तिने विज्ञान शाखेत उत्कृष्ट कामगिरी केली. वैद्यकीय शिक्षणाचं स्वप्न मनात ठेवून तिची तयारी सुरू होती. कठोर परिश्रमाच्या बळावर तिने MBBS मध्ये प्रवेश मिळवला आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
गेल्या काही वर्षांत वंजारवाडी गावाने शिक्षणात क्रांती घडवली आहे. सलग सहा मुलींनी वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवला असून, स्नेहा नागवडेचं यश त्यात आणखी एक मानाचा तुरा रोवतो. गावातील शिक्षक, मित्र-परिवार आणि ग्रामस्थ तिच्या या यशाबद्दल अभिमान व्यक्त करत आहेत.
ग्रामीण भागातील अनेक मुलींसाठी स्नेहाचं हे यश एक मोठी प्रेरणा आहे. आर्थिक अडचणी तसेच अडथळे असूनही चिकाटीने प्रयत्न केल्यास मोठे यश मिळू शकतं, हे तिने सिद्ध केलं आहे, तिने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. गावाची मान अभिमानाने उंचवणारे यश प्राप्त केले आहे.त्याबद्दल स्नेहा व तिच्या पालकांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !!