ब्रेकिंग न्यूज: एलसीबीचा गांजा तस्करांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’, १३२ किलो गांजासह २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना बेड्या
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी आता आक्रमक पाऊल उचलले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) कर्जत तालुक्यातील मिरजगाव हद्दीत मोठी कारवाई करत १३२ किलो गांजासह तब्बल २५ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दोघा तस्करांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ही कारवाई १८ रोजी सायंकाळी करण्यात आली. (mirajgaon karjat ahilyanagar news)

अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थ विक्री व तस्करी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसाार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक मिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना, त्यांना एक गोपनीय माहिती मिळाली होती.
गांजा तस्करीचा पर्दाफाश
मिळालेल्या माहितीनुसार, एम.एच. १४ जी.एच. ३२३० या क्रमांकाच्या स्कॉर्पिओ गाडीतून दोन इसम गांजाची मोठी खेप घेऊन कर्जत बाजूकडून पाथर्डीकडे जाणार होते. या माहितीची खातरजमा होताच, एलसीबीच्या पथकाने मिरजगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या मदतीने मिरजगाव-कर्जत रोडवरील महात्मा फुले चौक येथे ब्रिजखाली सापळा रचला.
संशयित स्कॉर्पिओ गाडी महात्मा फुले चौकात येताच पोलिसांनी ती अडवली. गाडीची झडती घेतली असता, डिक्कीमध्ये चार गोण्यांमध्ये लपवून ठेवलेला तब्बल १३२.८४ किलो ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी तातडीने गाडीतील दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
- ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे:
- गणेश अंकुश कराड (वय ३२, रा. आगसखांड, ता. पाथर्डी)
- सुखदेव शिवनाथ कदम (वय ३०, रा. पाथर्डी)
२५ लाखांचा मुद्देमाल जप्त
- या कारवाईत पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
- गांजा: १८ लाख १८ हजार रुपये किमतीचा (१३२.८४ किलो)
- वाहन: ७ लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ गाडी
- मोबाईल: २५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल
- एकूण किंमत: २५,४३,०००/- रुपये
NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार भाऊसाहेब राजू काळे यांच्या फिर्यादीवरून मिरजगाव पोलीस ठाण्यात NDPS कायदा (१९८५) च्या कलम ८ (क) आणि २० (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तस्करी नेमकी कुठून सुरू झाली आणि याचे जाळे कुठेपर्यंत पसरले आहे, याचा अधिक तपास एलसीबी व मिरजगाव पोलीस करत आहेत.
ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. किरणकुमार कबाडी, सपोनि विजय झंजाड, पोउपनि समीर अभंग, हृदय घोडके, संतोष खैरे, दिपक घाटकर, लक्ष्मण खोकले, बिरप्पा करमल, श्यामसुंदर जाधव, भिमराज खसे, राहुल डोके, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड मनोज साखरे, चालक अरुण मोरे, उमाकांत गावडे या पथकाने केली आहे.या कारवाईमुळे जिल्ह्यातील अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.