ब्रेकिंग न्यूज : जामखेडच्या राजकारणात मोठा भूकंप, जेष्ठ नेत्याने सोडली रोहित पवारांची साथ, दत्ता वारे यांनी केली मोठी घोषणा
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेडच्या राजकारणात शुक्रवारी (१० रोजी) मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी (SP) पक्षात गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या जेष्ठ नेत्याने पक्षाला रामराम ठोकण्याची मोठी घोषणा केली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते दत्तात्रय वारे यांनी रोहित पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या तोंडावर वारे यांनी घेतलेला निर्णय रोहित पवार यांना मोठा धक्का देणारा ठरला आहे.

जामखेड तालुक्याच्या राजकारणात गेल्या ३५ वर्षांपासून सक्रीय असलेल्या दत्तात्रय वारे यांनी आज रोहीत पवारांची साथ सोडण्याची मोठी घोषणा करत जामखेड तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष असलेले दत्तात्रय वारे हे गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा होती, अखेर ही चर्चा शुक्रवारी खरी ठरली. वारे यांनी पत्रकार परिषद घेत पक्ष सोडत असल्याची घोषणा केली.
यावेळी दत्ता वारे म्हणाले की, पक्षाचा जेव्हा मी तालुकाध्यक्ष होता त्यावेळी पक्ष संघटना वाढण्यासाठी आम्हाला कसलेही अधिकार नव्हते. आमदार रोहीत पवार यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून मी पक्ष सोडत आहे, येत्या १५ दिवसांत पुढील राजकीय भूमिका ठरवू, यापुढे मी ज्या पक्षात जाईन तिथे पक्षसंघटनेसाठी काम करेन, यापुढे कुठलीही निवडणूक लढवणार नसल्याची मोठी घोषणा त्यांनी केली.
गेल्या ३५ वर्षांपासुन मी राजकारणात सक्रिय आहे. वीस वर्षे भारतीय जनता पार्टीचे व पंधरा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम केले आहे. भारतीय जनता पार्टीत असताना युवा मोर्चाचा अध्यक्ष ते जिल्हा युवा मोर्चाचा अध्यक्ष या पदावर काम केले. तसेच पंचायत समिती सभापती व जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले. मागच्या १५ वर्षांत मी राष्ट्रवादीत होतो. या काळात पक्षाचे इमानदारीने काम केले. २०१९ व २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांना निवडून आणण्यासाठी मेहनत घेतली. त्यांची कार्यपद्धती कार्यकर्त्यांना बळ देणारी नाही, एकाधिकारशाही कारभार करतात, पक्ष संघटनेतील कार्यकर्त्यांना कुठलेच अधिकार दिले जात नाहीत, असे यावेळी वारे म्हणाले.
आजपासून मी पक्षातून मोकळा झालो आहे. यापुढे ज्या पक्षात जाईल त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करणार असून कुठलीही निवडणुक लढणार नाही, नव्या पक्षात संघटनात्मक काम करणार आहे. ज्या व्यासपीठावर मला योग्य सन्मान मिळेल त्याच पक्षात मी प्रवेश करणार आहे. तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील पंधरा दिवसांत योग्य ती राजकीय भूमिका जाहीर करू, अशी घोषणा वारे यांनी यावेळी केली.