जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील चोंडी येथील एका तरुणास गावठी कट्ट्यासह अटक केल्याची घटना ताजी असतानाच आता जामखेड तालुक्यातील बटेवाडी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गावठी कट्टा आणि जिवंत काडतुस बाळगुन फिरत असलेल्या एका २१ वर्षीय तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ही धडक कारवाई ४ सप्टेंबर रोजी बटेवाडी येथे करण्यात आली.या कारवाईमुळे जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर असे की, बटेवाडी येथील २१ वर्षीय तरूण संदिप बंडु मारकड हा विनापरवाना गावठी कट्टा व काडतुस बाळगुन जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे फिरत असल्याची गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने ४ रोजी बटेवाडीत छापेमारी केली.
त्यावेळी पथकाला संदिप मारकड हा तरूण मिळुन आला. दोन पंचासमक्ष गावठी कट्टा व जिवंत काडतुस बाबत पथकाने त्याच्याकडे विचारपुस केली. त्यानंतर पथकाने त्याच्याकडून लपवुन ठेवलेला ३५,०००/- रुपये किंमतीचा एक देशी बनावटीचा कट्टा व १,०००/- रुपये किंमतीचे १ जिवंत काडतुस असा एकुण ३६,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
याप्रकरणी एलसीबीचे पोलिस काँस्टेबल मनोज साखरे यांच्या फिर्यादीवरुन संदिप बंडु मारकड वय-२१ वर्षे रा. बटेवाडी, ता. जामखेड याच्याविरुद्ध जामखेड पोलीस स्टेशन गु.र.नं. ४९७/२०२५ आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.

जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली. या पथकात पोलिस सब इन्स्पेक्टर अनंत सालगुडे, सहाय्यक फौजदार रमेश गांगर्डे, पोलिस हेड काँस्टेबल हदय घोडके व पोलिस नाईक शामसुंदर जाधव यांचा समावेश होता.
अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणा-या इसमांविरुध्द जास्तीत जास्त कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने मोठी मोहिम उघडल्याने अनेकांचे धाबे दणाणून गेले आहेत. जामखेड तालुक्यात अवैध शस्त्रे बाळगणारांची संख्या मोठी आहे. या सर्वांचा शोध घेऊन त्यांच्याही मुसक्या आवळल्या जाणार का ? याकडे जामखेड तालुक्याचे लक्ष लागले आहे.