जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड गोळीबार प्रकरणी पोलिसांनी शुभम लोखंडे (आष्टी), उल्हास माने (जामखेड) व बालाजी शिवाजी सापते (आष्टी) या तिघांना गावठी कट्ट्यासह अटक केली आहे. ही धडक कारवाई नगर एलसीबीच्या पथकाने पार पाडली.इतर फरार आरोपींचा एलसीबी व जामखेड पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे.

जामखेडच्या बीड रोड परिसरातील हाॅटेल न्यू कावेरी येथे बुधवारी मध्यरात्री गोळीबाराची व हाॅटेल तोडफोडीची थरारक घटना घडली होती. या घटनेत हाॅटेल मालक रोहित अनिल पवार याच्या पायाला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणात जामखेड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदार जबानी आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेत शुभम लोखंडे रा आष्टी,उल्हास विलास माने उर्फ वस्ताद रा. जांबवाडी रोड जामखेड,अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे रा भवरवाडी अर्शद अमीन सय्यद रा. कडा ता आष्टी या चार आरोपींची ओळख पटवली होती.
गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या रोहित अनिल पवार (हाॅटेल कावेरी) याच्या फिर्यादीवरून शुभम लोखंडे रा आष्टी, उल्हास विलास माने उर्फ वस्ताद रा. जांबवाडी रोड जामखेड, अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे रा भवरवाडी अर्शद अमीन सय्यद रा. कडा ता आष्टी या चार आरोपींची इतर सहा ते सात अश्या ११ जणांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, १८९ (२),१९१ (२),१९१ (३), १९०, ३२४ (५) ३५१ (२) (३) सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

जामखेड गोळीबार प्रकरणात तिघांना अटक
जामखेड गोळीबार प्रकरणात निष्पन्न झालेल्या चौघा आरोपींपैकी उल्हास विलास माने उर्फ वस्ताद याला जामखेड पोलिसांनी कालच (१८ रोजी) आष्टी परिसरातून अटक केली होती. त्यानंतर आज (१९ रोजी) शुभम लोखंडे (आष्टी) व बालाजी शिवाजी सापते (आष्टी) या दोघांना नगर सोलापुर रोडवरील वाळुंज शिवारातील हाॅटेल शाम समोरून अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून एक गावठी कट्टा व एक सीसीटिव्ही डिव्हीआर जप्त केला आहे.अटकेतील आरोपी उल्हास माने याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर फरार आरोपींचा पोलिस कसून शोध घेत आहेत.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार अतुल लोटके, शामसुंदर जाधव, बाळासाहेब गुंजाळ, मनोज साखरे, सागर ससाणे, योगेश कर्डीले, प्रशांत राठोड, महादेव भांड, चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने पार पाडली.
धगधगता वाद अन् राडा
हल्लेखोर आणि फिर्यादी यांच्यात जुना वाद आहे. दोन्ही गटाच्या विरोधात यापुर्वी तीन गुन्हे दाखल आहेत. आता चौथा गुन्हा दाखल झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात यातील जखमी रोहित अनिल पवार याने आरोपींना मारहाण केली होती. त्याचाच बदला घेण्यासाठी आरोपींनी कावेरी हाॅटेलची तोडफोड करत गोळीबार केल्याचे बोलले जात आहे.