ब्रेकिंग न्यूज : जामखेड – करमाळा मार्गावर भीषण अपघात, स्विफ्टच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, झिक्री शिवारातील घटना
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील झिक्री शिवारातून भीषण अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. स्विफ्ट कारच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून ही घटना जामखेड करमाळा महामार्गावर घडली.

आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथील रामा बाबुजी भिसे वय ३९ असे मृताचे नाव आहे. हा तरूण जामखेड तालुक्यातील नान्नज येथील एका हाॅटेलमध्ये वेटरचे काम करत होता. तो जामखेडहून नान्नजच्या दिशेने जात असतानाच समोरून आलेल्या स्विफ्ट कारने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की भिसे याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्विफ्ट कार चालक घटनास्थळावरून फरार झाला. ही घटना गुरुवारी दुपारी ३ वाजता घडली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जामखेड पोलिस करत आहेत.