जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.एलसीबीने मोठी कारवाई करत एका तरूणाकडून ३ जिवंत काडतुसे अन् एक गावठी कट्टा हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संग्राम जगताप याला बेड्या ठोकल्या आहेत. अटकेतील आरोपी हा पुण्यातील रहिवासी आहे. एलसीबीच्या या कारवाईमुळे कर्जत तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील क्रांतीसुर्य महात्मा फुले ब्रिज खाली एक तरूण गावठी कट्ट्यासह थांबलेला असल्याची गुप्त माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने २६ रोजी सदर ठिकाणी जाऊन खातरजमा केली. त्याठिकाणी एक तरूण संशयास्पदरित्या फिरत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. यावेळी पथकाने सदर तरूणाला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याच्या ताब्यातून ३ जिवंत काडतुसे अन् एक गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे.
एलसीबीने यावेळी केलेल्या कारवाईत संग्राम सुनिल जगताप वय २३ वर्षे, रा. संतोषनगर, कात्रज, पुणे या तरूणाकडून ३५ हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल (अग्निशस्त्र), आणि तीन हजाररुपये किमतीचे ०३ जिवंत काडतुस असा एकुण ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदर प्रकरणी पोलिस काँस्टेबल भाऊसाहेब राजु काळे नेम स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांच्य् फिर्यादीवरुन मिरजगांव पोलीस ठाणे गु.र.नं. ३०/२०२६ आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे संग्राम जगताप विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मिरजगांव पोलीस स्टेशन करीत आहे.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार पाडली. या पथकात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार हृदय घोडके, भिमराज खर्से, शामसुंदर जाधव,अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, मनोज साखरे, महादेव भांड यांच्यासह मिरजगांव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय झंजाड, पोलीस अंमलदार सुनिल खैरे, समीर सय्यद, अशोक रक्ताटे यांचा समावेश होता.