जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत-जामखेडच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी मोठी घटना आज समोर आली आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र (तात्या) फाळके यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. दिवाळी फराळाचा आस्वाद घेत दोन्ही उभय नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. या भेटीने राजकीय वर्तुळात धुराळा उडवून दिला आहे.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असलेले राजेंद्र फाळके यांनी नुकताच जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. फाळके पक्षात राहणार की पक्षांतर करणार याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले असतानाच गुरुवारी मोठी राजकीय घडामोड समोर आली. विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे यांनी अचानक फाळके यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटीदरम्यान प्रा. शिंदे आणि फाळके यांच्यात प्रदिर्घ चर्चा झाली. राजकारणातील विविध विषयांवरही दोघांमध्ये अनौपचारिक संवाद झाला.

या भेटीच्या वेळी कोरेगावचे माजी सरपंच शिवाजी आप्पा फाळके, तसेच फाळके परिवारातील इतर सदस्यही उपस्थित होते. प्रा. राम शिंदे यांनी फाळके परिवाराशी सविस्तर संवाद साधत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. या सदिच्छा भेटीमुळे केवळ कर्जत-जामखेडच नव्हे, तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. राजकीय जाणकार आणि कार्यकर्त्यांमध्ये विविध तर्क-वितर्क सुरू झाले असून, या भेटीचा पुढील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कर्जत-जामखेड परिसरात ही भेट चर्चेचा प्रमुख विषय ठरली असून, दोन्ही नेत्यांमधील संवाद भविष्यातील राजकीय घडामोडींना दिशा देणारा ठरू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या भेटीवेळी कर्जत तालुक्यातील भाजपाचे अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते.

दरम्यान, प्रा राम शिंदे यांनी आज राजेंद्र फाळके यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी फाळके कुटूंबाने शिंदे यांचा यथोचित सन्मान करत उत्स्फूर्त स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी दिवाळी फराळाचा आस्वाद घेत खमंग राजकीय चर्चा केली. शिंदे फाळके भेटीने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना जोर आला आहे.
