जामखेड टाइम्स वृत्तसेवा : ऐन रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जामखेड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २५ वर्षीय विवाहित तरूणीने आपल्या दोन लेकरांसह विहीरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. ही घटना शुक्रवारी, ८ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी नायगाव येथे घडली. या घटनेमुळे जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील नायगाव येथील रूपाली उगले या विवाहित तरूणीने आपल्या पोटच्या दोन लेकरांसह घराशेजारील विहीरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेत पाण्यात बुडून रूपाली नाना उगले (वय २५), समर्थ नाना उगले (वय ५), चिऊ नाना उगले (वय ३) या तिघांचा मृत्यू झाला आहे. मयत चिमुकले शाळेच्या गणवेशात होते असे समजते.
सदर घटनेचे माहिती मिळताच खर्डा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक उज्वल राजपुत फौजफाट्यासह दाखल झाले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांचा जमाव होता. यावेळी पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.
सदर घटना आत्महत्या की घातपात याचा खर्डा पोलिस कसून तपास करत आहेत. या घटनेबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, खर्डा पोलिसांच्या तपासानंतरच सदर घटनेबाबत काय खुलासा होतो याकडे जामखेड तालुक्याचे लक्ष लागले आहे.