जामखेड ब्रेकिंग : महापुराचा धोका तुर्तास टळला, चोंडी ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास, रात्री काय घडलं ? वाचा सविस्तर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील चोंडी येथील सिना नदीला सोमवारी सायंकाळी मोठा पुर आला होता. मध्यरात्रीनंतर नदीच्या पाण्यात झपाट्याने वाढ झाली. पुलावरून आठ ते दहा फुट पाणी वाहत होते. त्यामुळे पुराचे पाणी गावात शिरण्यास सुरुवात झाली होती. चोंडीला महापुराचा वेढा पडणार अशीच स्थिती निर्माण झाली होती. रात्रभर ग्रामस्थ भितीच्या सावटाखाली होते. युवक व ग्रामस्थांनी संपुर्ण रात्र जागता पाहरा देत रात्र जागून काढली. सिना धरणाच्या विसर्गात घट झाल्यानंतर पाणी पातळी थोडी कमी झाली आणि मंगळवारची सकाळ चोंडीकरांसाठी दिलासा देणारी ठरली. तूर्तास महापुराच्या संकटातून चोंडी ग्रामस्थांची सुटका झाली आहे. महापुराचा धोका तुर्तास टळला आहे.

सोमवारी पहाटे जामखेड सह शेजारील तालुक्यांना पावसाने जोरदार झोडपून काढले. विशेषता: आष्टी तालुक्यात अतिवृष्टीने दाणादाण उडवून दिली. यामुळे आष्टी तालुक्यातील सर्व नद्यांना महापूर आला. यामुळे आष्टी तालुक्यातील अनेक गावांना पुराचा मोठा फटका बसला. सोमवारी पावसाने केलेल्या जोरदार बॅटिंगमुळे सीना नदीला मोठा पुर आला आहे. याचा मोठा फटका श्री क्षेत्र चोंडी गावाला बसण्याची दाट शक्यता आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर चोंडीत पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती.

सीना आणि तिच्या उपनद्यांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यातच सीना धरणाच्या विसर्गात मोठी वाढ करण्यात आली होती. याचा मोठा फटका चोंडी गावाला बसताना दिसत होता. चोंडी येथून वाहणार्या सीना नदीवरील पुलावरून आठ ते दहा फुट पाणी वाहत होते. पुराचे पाणी चोंडी गावात शिरण्यास सुरुवात झाली होती.

चोंडीतील तलाठी कार्यालयाला पुराच्या पाण्याचा वेढा पडला होता. तसेच हेलीपॅड व विश्रामगृह परिसरात पाणी शिरू लागले होते. याशिवाय सभागृहाला वळसा घालून पाणी शिल्यसृष्टीच्या समोरून वाहताना दिसत आहे. शिल्पसृष्टीच्पा बुरुजाला पाणी लागले होते. याशिवाय चोंडी – हळगाव रस्त्यावरील पुलावर पाणी आले आहे. सोमवारी रात्री बारा नंतर अशी स्थिती निर्माण झाल्याने चोंडी ग्रामस्थांच्या चिंता वाढल्या होत्या.

सिना नदीच्या पुराचा मोठा धोका देवकरवाडी तसेच चोंडीतील झोपडपट्टी भागाला बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. मध्यरात्रीनंतर पुराच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने संपुर्ण गाव भितीच्या सावटाखाली आले होते. गावातील नागरिक आणि तरुणांनी जागता पाहरा देत रात्रभर पुरस्थितीवर बारकाईने लक्ष दिले.प्रशासनही सतर्क होते.
दरम्यान चोंडीला महापुराचा वेढा पडणार की काय ? अशी नाजुक स्थिती निर्माण होताच विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी वेगाने सुत्रे हलवत सिना धरणाच्या विसर्गात घट करण्यासाठी हालचाली केल्या. सिना धरणाचा विसर्ग टप्प्या टप्प्याने कमी करण्यात आला. त्यानंतर सिनेचा महापुर कमी झाला. रात्री सभागृहाजवळ असलेले पुराचे पाणी सकाळी साडेसातच्या सुमारास शिल्पसृष्टी कमानीजवळील झेंड्याजवळ गेले. आणि चोंडी ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला. मंगळवारची सकाळ चोंडीकरांची मोठ्या संकटातून सुटका झाल्याची साक्ष देणारी ठरली.
दरम्यान, आणखीन दोन ते तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. सिना नदीच्या पाणलोट क्षेत्रातील सर्व नद्या दुधडी भरून वाहत आहेत. छोटे मोठे सिंचन प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. येत्या दोन दिवसांत सिना नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस झाल्यास सिना नदीला मोठा पुर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.