अतिवृष्टीचा फटका : जामखेड तालुक्यातील १८ रस्ते वाहतुकीसाठी बंद, अनेक पुल उखडले, रस्ते वाहून गेले, जनजीवन विस्कळीत
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील अनेक भागात पावसाने तुफान बॅटींग करून पुरती दाणादाण उडवून दिली आहे. शुक्रवारी आणि शनिवारी जामखेड तालुक्यात अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला.यामुळे तालुक्यात पुन्हा महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. सीना, विंचरणा, खैरी, मांजरा, कौतुका, नांदणी यासह अनेक लहान मोठ्या नद्यांना महापुर आला आहे. महापुरामुळे अनेक मार्गावरील पुल उध्वस्त झाले आहेत. तर काही ठिकाणी रस्ते उखडून गेले आहेत. तर काही ठिकाणी पुल पाण्याखाली गेले आहे. यामुळे तालुक्यातील १६ प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. यामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

जामखेड तालुक्यातील बंद असलेले मार्ग खालीलप्रमाणे
- पिंपरखेड – अरणगाव रस्ता (पूलावर पाणी)
- फक्राबाद – अरणगाव रस्ता (पूलावर पाणी)
- चोंडी – चापडगाव रस्ता (पूलावर पाणी)
- दिघोळ – माळेवाडी रस्ता (पूलावर पाणी)
- खर्डा – तेलंगशी रस्ता (रस्ता खचला)
- खर्डा – जायभायवाडी रस्ता (खड्डे पडले)
- नान्नज – जवळके रस्ता (पूलावर पाणी)
- राजुरी – पिंपळगाव उंडा रस्ता (पूलावर पाणी)
- वाघा – पिंपळगाव उंडा रस्ता (पूलावर पाणी)
- धनेगाव – सोनेगाव रस्ता (पूलावर पाणी)
- जामखेड – रत्नापूर रस्ता (पूलावर पाणी)
- साकत – कोल्हेवाडी रस्ता (पूलावर पाणी)
- नायगाव रोड – बांधखडक रस्ता (पाण्याखाली)
- पांढरवाडी गावठाण – चव्हाणवस्ती रस्ता (वाहून गेला)
- पिंपळगाव उंडा – तरडगाव रस्ता (पूल पाण्याखाली)
- तरडगाव – सोनेगाव रस्ता (पूल खचला)
- चोंडी हळगाव रस्ता : पुल पाण्याखाली
- गिरवली कवडगाव रस्ता – पुल पाण्याखाली
शुक्रवारी व शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जामखेड तालुक्यातील १७ घरांची पडझड १ मेंढी व १ गायीचा मृत्यू झाला आहे. तर आज दि २७ रोजी लेहेनेवाडी येथे ७ शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी संपुर्ण दिवसभर तालुक्यात पावसाचा जोर कायम होता. शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाच्या नुकसानीची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही.
सीना नदीला महापुर आला आहे. सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यामुळे सीना नदीला महाप्रचंड पुर आलाय. महापुराचा फटका श्री क्षेत्र चोंडीला बसला आहे. चोंडी शिल्पसृष्टीपर्यंत पाणी शिरले आहे. हळगाव चोंडी रस्त्यावरील पुल पाण्याखाली गेल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.