जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा (resigns) दिला आहे. चाकणकर यांना नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण (Ashok Kharat Case Nashik) चांगलेच भोवलं आहे. चाकण यांना या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला आहे.

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर अशोक खरातचे अनेक कारनामे समोर आले होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरात सोबतचे फोटो आणि त्याची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ समोर आले होते.
चाकण ह्या खरातच्या ट्रस्टवर ट्रस्टी असल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात येत होती. त्यांच्याविरोधात चौफेर टीका करण्यात येत होती. अखेर चाकणकर यांनी आज २० रोजी रात्री उशिरा आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रवादीच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सादर केला.
रूपाली चाकणकर यांची राजीनाम्याची घोषणा
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, आमच्या नेत्या तसेच राज्याच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावाहिनींकडे माझ्याकडे असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला. सध्या विविध माध्यमातून होत असलेल्या आरोपांची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने चौकशी व्हावी म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारत मी हा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत योग्य तो निर्णय आदरणीय सुनेत्रावहिनी घेतील! या प्रकरणाबाबत लवकरच मी सविस्तर भूमिका मांडेल, अशी फेसबुक पोस्ट लिहीत रूपाली चाकणकर यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.
अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर पुरत्या अडचणीत सापडल्या होत्या. दररोज नवनवीन व्हिडीओ आणि फोटो समोर येत होते. एवढंच नाहीतर राष्ट्रवादीतूनही या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनी तर उघडपणे चाकणकरांवर टीकेची संधी सोडली नाही. त्यामुळे संध्याकाळी राजकीय घडामोडींना वेग आला. चाकणकरांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकर यांना तातडीने राजीनामा देण्याचे आदेश दिले.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर देवगिरी बंगल्यावर दाखल झाल्यात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. यावेळी सुनेत्रा पवार आणि चाकणकर यांच्यामध्ये जवळपास २० ते २५ मिनिटं चर्चा झाली. या भेटीमध्ये चाकणकर यांनी आपली बाजू मांडली. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे चाकणकर यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. हा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उद्देशून लिहिला आहे.
चाकणकर यांनी राजीनामा पत्रात काय लिहिलं?
प्रति,
मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब,
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य
विषय: अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य महिला आयोग ह्या पदाचा राजीनामा स्विकारणेबाबत
माननीय महोदय,
मी, सौ. रुपाली निलेश चाकणकर, वरील विषयान्वये आपणांस विनंतीपूर्वक कळवू इच्छिते की, दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी माझी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती. माझ्या वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेनं सदर पदाचा राजीनामा ह्या पत्राद्वारे आपणांस सादर करत आहे.
आजवर माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला सर्वतोपरी सहकार्य केले त्याबद्दल मी आपली व सर्व सहकाऱ्यांची शतश: ऋणी आहे. भविष्यातही आपले असेच सहकार्य राहील असा मला विश्वास आहे.
तरी आपण माझा अध्यक्षा, राज्य महिला आयोग ह्या पदाचा राजीनामा स्वीकारावा अशी आपणांस नम्र विनंती आहे.
धन्यवाद…!