ब्रेकिंग न्यूज : चोंडीला महापुराचा धोका ? सीना नदीच्या पाणीपातळीत वाढ, ग्रामस्थांचा जागता पाहरा सुरू
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सोमवारी पहाटे जामखेड सह शेजारील तालुक्यांना पावसाने जोरदार झोडपून काढले. विशेषता: आष्टी तालुक्यात अतिवृष्टीने दाणादाण उडवून दिली. यामुळे आष्टी तालुक्यातील सर्व नद्यांना महापूर आला. यामुळे आष्टी तालुक्यातील अनेक गावांना पुराचा मोठा फटका बसला. सोमवारी पावसाने केलेल्या जोरदार बॅटिंगमुळे सीना नदीला मोठा पुर आला आहे. याचा मोठा फटका श्री क्षेत्र चोंडी गावाला बसण्याची दाट शक्यता आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर चोंडीत पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे.

सीना आणि तिच्या उपनद्यांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यातच सीना धरणाच्या विसर्गात वाढ झाली आहे. याचा मोठा फटका चोंडी गावाला बसताना दिसत आहे. चोंडी येथून वाहणार्या सीना नदीवरील पुल सोमवारी सायंकाळी पाण्याखाली गेला आहे.त्यातच रात्री अकरा नंतर नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने चोंडी गावात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे.

तलाठी कार्यालयाला पाण्याचा वेढा पडला आहे. तसेच हेलीपॅड व विश्रामगृह परिसरात पाणी शिरू लागले आहे. याशिवाय सभागृहाला वळसा घालून पाणी शिल्यसृष्टीच्या समोरून वाहताना दिसत आहे.शिल्पसृष्टीच्पा बुरुजाला पाणी लागले आहे. तसेच सीना नदीवरील पुलावरून ७ ते ८ फुट पाणी वाहत आहे.याशिवाय चोंडी – हळगाव रस्त्यावरील पुलावर पाणी आले आहे.

सिना नदीला आलेल्या पुरामुळे चोंडी ग्रामस्थांच्या चिंता वाढल्या आहेत. गावातील नागरिक आणि तरुण पाणी पातळीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. संपुर्ण गाव जागे आहे. मध्यरात्रीनंतर सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यास चोंडी गावाला पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना खबरदारीच्या सुचना दिल्या आहेत. पोलिसांनी रात्री चोंडी गाठत परिस्थितीची माहिती जाणून घेतली.
चोंडी गावाला महापुराचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सीना नदीच्या पुरामुळे चोंडीतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण आहे.