संगमनेर : गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुका अनेक वादग्रस्त प्रकरणांमुळे राज्यात सातत्याने चर्चेत आहे.गुरूवारी घडलेल्या एका घटनेमुळे संगमनेर तालुका पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या भागाचे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. (Amol Khatal News )

माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्यातील वादामुळे आधीच चर्चेत असलेल्या संगमनेर शहरात गुरुवार, 28 ऑगस्ट 2025 रोजी आणखी एका गंभीर घटनेची भर पडली.शिवसेना (शिंदे गट) चे आमदार अमोल खताळ यांच्यावर खांडगाव येथील एका तरूणाने हल्ला केल्याची घटना घडलीय. ही घटना संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी घडली.
ऐन गणेशोत्सवाच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे संगमनेर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. या हल्ल्यानंतर स्थानिक प्रशासनाने पोलिस बंदोबस्त वाढवला असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहे.
नेमके काय घडले ?
आमदार अमोल खताळ हे संगमनेरमधील खांडगाव येथे आयोजित संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीने हात मिळवण्याच्या बहाण्याने अमोल खताळ यांच्या कानशिलात लगावली. खताळ यांच्यावर अचानक हल्ला झाल्याने घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता.हल्लेखोराने अचानक हल्ला केल्याने उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. मालपाणी उद्योग समूहाच्या सुरक्षारक्षकांनी तात्काळ हस्तक्षेप करत हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतले. या घटनेनंतर खताळ यांच्या समर्थकांनी मालपाणी लॉन्सबाहेर मोठ्या संख्येने गर्दी केली, ज्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पावले उचलली.
हल्ल्याच्या बातमी समोर येताच संगमनेरमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली.शेकडो तरुणांनी मालपाणी लॉन्सबाहेर गर्दी केली होती.संगमनेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून, हल्लेखोराविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे. हल्ल्यामागील कारण आणि हल्लेखोराची पार्श्वभूमी याबाबत पोलिस वेगाने तपास करत आहेत.पुढील तपासातून अधिक माहिती समोर येईल. आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची घटन घडल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. आमदार अमोल खताळ यांच्यावरील या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. हे हल्लेखोर कुणाचे पुरस्कृत आहेत का? याची माहिती घेऊन यासंदर्भात चौकशीचे आदेश पोलिसांना दिले आहेत. भ्याड करून महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कमी होईल असा काहींचा गैरसमज आहे, हा गैरसमज दूर करायला वेळ लागणार नाही, असे म्हणत विखे पाटील यांनी राजकीय विरोधकांना इशाराही दिला. तर, दोषींवर तात्काळ कारवाईचे आदेशही दिल्याचं त्यांनी म्हटलं.