जामखेड : शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपा नेते प्रशांत शिंदे उतरले मैदानात, सभापती प्रा राम शिंदे यांच्याकडे केली मोठी मागणी
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Government Soil Testing Centre : मातीच्या (शेतीच्या) आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी अत्यावश्यक असलेले माती परीक्षण केंद्र जामखेड तालुक्यात मंजूर व्हावे यासाठी भाजपा युवा नेते प्रशांत (भाऊ) शिंदे मैदानात उतरले आहेत. मौजे जवळा येथे शासकीय माती परीक्षण केंद्र मंजूर करावे अशी मोठी मागणी त्यांनी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. प्रशांत शिंदे यांच्या मागणीला यश आल्यास जामखेड तालुक्यातील हजारो शेतकरी बांधवांना याचा मोठा फायदा होणार आहे.

शेतकरी बांधवांना शेतीत नवनवीन पिक प्रयोग करण्यासाठी माती परीक्षण करणे आवश्यक असते.माती परिक्षणासाठी जामखेड तालुक्यात हक्काचे शासकीय केंद्र नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तालुक्यात हक्काचे माती परीक्षण केंद्र असावे अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. शेतकरी बांधवांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असणारा हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रशांत शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे.
जामखेड तालुक्यात माती परीक्षणासाठी कोणतेही अधिकृत शासकीय केंद्र उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी प्रयोगशाळांचा आधार घ्यावा लागतो, यात वेळ, पैसा आणि शास्त्रीय अचूकतेचा प्रश्न निर्माण होतो. जवळा येथे शासकीय माती परीक्षण केंद्र मंजूर झाले, तर शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार सेवा मिळेल.माती परीक्षणाच्या आधारावर शेतकरी योग्य प्रमाणात खतांचा वापर करू शकतील, पाण्याचा अचूक नियोजन करता येईल आणि शेतीच्या उत्पादनात मोठी वाढ होण्यास मदत होऊ शकते, हीच बाब विचारात घेऊन जामखेड तालुक्यात शासकीय माती परीक्षण केंद्र उभारण्यात यावे अशी मागणी शिंदे यांनी प्रा राम शिंदे यांच्याकडे केली आहे.
जामखेड तालुक्यात शासकीय माती परीक्षण केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना लांबच्या प्रयोगशाळांमध्ये माती नमुने पाठवावे लागतात. यासाठी लागणारा वेळ, खर्च आणि गैरसोयीमुळे अनेक शेतकरी हे परीक्षणच टाळतात, याचे प्रतिकूल परिणाम शेती उत्पादनावर होताना दिसतात, तालुक्यातील शेतकरी बांधवांना आर्थिक समृद्धीकडे घेऊन जाण्यासाठी शासकीय माती परीक्षण केंद्र तालुक्यात होणे आवश्यक आहे. जवळा येथे सदरचे केंद्र मंजूर झाल्यास ते शाश्वत शेतीसाठी क्रांतिकारी पायरी ठरेल, असे मत प्रशांत शिंदे यांनी व्यक्त केले. शिंदे यांची मागणी तालुक्याच्या व्यापक हिताची असल्याने शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेचे शेतकरी बांधवांमधून कौतूक होत आहे.
जामखेड तालुक्यातील जवळा येथे शासकीय माती परीक्षण केंद्र मंजूर करण्यात यावे त्याचबरोबर पावसाचे पाणी मोजण्यासाठी पर्जन्य मापक यंत्र बसवण्यात अशी मागणी प्रशांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी भाजप युवा नेते व उपसरपंच प्रशांत (भाऊ) शिंदे यांच्यासमवेत सरपंच सुशील आव्हाड, माजी उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर , कुलदीप पवार सह आदी उपस्थित होते.