मोठी बातमी : जामखेड बंदचे अंदोलन स्थगित, उपोषण मागे पण साखळी उपोषणाचे अंदोलन सुरु राहणार, नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गा लगतच्या अतिक्रमणाच्या प्रश्नावरून पुकारण्यात आलेले जामखेड बंदचे अदोलन स्थगित करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे डेप्युटी इंजिनियर चेमटे यांनी ५ मार्च २०२६ पर्यंत महामार्गाची अधिकृत हद्द निश्चित करून कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला, मात्र सर्व पक्षीय साखळी उपोषण सुरूच राहणार आहे. याबाबतचा निर्णय २५ रोजी सायंकाळी घेण्यात आला.

Big news,Jamkhed bandh movement suspended, hunger strike called off but chain hunger strike movement will continue, what exactly happened? Read in detail,

जामखेड शहरातून जाणाऱ्या 548D या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडले आहे.यामुळे जामखेडकर प्रचंड त्रस्त आहेत. ठेकेदाराची मनमानी, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि अतिक्रमणधारकांचा आडमुठेपणा यामुळे शहरातून जाणारा विकासाचा हा मार्ग जनतेला नकोसा झाल्यात जमाय.राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडल्याने खड्डे, धुळ आणि वाहतुक कोंडी यामुळे जनता प्रचंड त्रस्त आहे.जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झालाय.

सदर प्रश्नावर तोडगा निघावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी दोन दिवसांपासून उपोषणाचे अंदोलन हाती घेतले होते.या अंदोलनाला जामखेडकरांनी भरभरून पाठिंबा दिला.याच अंदोलनाचा पुढचा भाग म्हणून सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी गुरूवारपासून बेमुदत जामखेड बंदचे अंदोलन हाती घेण्याचा इशारा दिला होता.

यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने आज २५ रोजी सलग पाच तास मॅरेथॉन बैठका घेत या अंदोलनावर तोडगा काढण्यासाठी जीवाचे रान केले. अखेर ५ मार्च २०२६ पर्यंत महामार्गाची अधिकृत हद्द निश्चित करून पुढील कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन राष्ट्रीय महामार्ग विभागाचे डेप्युटी इंजिनियर चेमटे यांनी अंदोलकांना दिले. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांचे उपोषण मागे घेण्यात आले. तसेच जामखेड बंदचे अंदोलन स्थगित करण्यात आले.

मात्र जोपर्यंत अतिक्रमणाच्या प्रश्नावर ठोस तोडगा निघत नाही तोपर्यंत सर्व पक्षीय साखळी उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच निर्धारित मुदतीत हद्द निश्चित न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी अंदोलकांकडून देण्यात आला आहे. २६ पासून साखळी उपोषण सुरु राहणार आहे.

जामखेड शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. राष्ट्रीय महामार्गालगतचे अतिक्रमणे तातडीने हटवावीत, अतिक्रमणधारक छोटा असा की मोठा कोणालाच अभय देऊ नका अशी जामखेडकरांची तीव्र भावना आहे. अश्यातच राष्ट्रीय महामार्गाला अडथळा ठरणारे अतिक्रमणे जमिनदोस्त व्हावेत यासाठी सुरु असलेल्या अंदोलनामुळे जामखेडकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आता हद्द निश्चितीनंतर अतिक्रमणे निघणार की पुन्हा ये रे माज्या मागल्या असे होणार ? ५ मार्चनंतर काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.